सुयशची पॅरालिम्पिकसाठी निवड
By Admin | Published: September 6, 2016 01:53 AM2016-09-06T01:53:01+5:302016-09-06T01:53:01+5:30
अपंग जलतरणपटू सुयश नारायण जाधव याची ब्राझील येथे होणाऱ्या रिओ पॅरालिम्पिकच्या जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली
नासीर कबीर,
करमाळा- तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश नारायण जाधव याची ब्राझील येथे होणाऱ्या रिओ पॅरालिम्पिकच्या जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
करमाळा तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश जाधव (वय २२) याची पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत निवड झाल्याने तो जलतरण स्पर्धेत निवड झालेला जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. रशियात झालेल्या आयबॉज वर्ल्ड गेम्समध्ये सुयश जाधवने ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्णपदक पटकावून त्याने रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.
७ ते १८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या १९ सदस्यांचे पथक रवाना झाले आहे. यामध्ये समावेश असलेला सुयश ५० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर फ्री स्टाईल, २०० मीटर वैयक्तिक मिडले अशा तीन प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी व १२ सप्टेंबरला सायंकाळी ८ वाजता, १३ सप्टेंबरला ६ वाजून ३३ मिनिटांनी सुयश सहभागी असलेल्या स्पर्धा होणार आहेत.
विजेच्या धक्क्याने अपघात
लहानपणी विजेच्या धक्क्याने झालेल्या अपघातानंतर दोन्ही हात कोपरापासून कापावे लागल्याने अपंग बनलेल्या सुयशने वडील नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणात उल्लेखनीय कौशल्य दाखवत जलतरणातील एस. सेव्हन प्रकारात ५० मीटर बटरफ्लाय या शर्यतीचा जागतिक विक्रम आहे. चीनच्या पॅन शियून याने २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २९.४९ वेळेत
पूर्ण केली होती. सुयशची यामधील सर्वोत्तम कामगिरी ३३.७३ अशी आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेतून सातत्याने पदकांची लयलूट करणारा सुयश आता पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
>पदक जिंकू...
रिओ येथे होणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेतील सुवर्ण पदक आपण पटकावू, असा विश्वास सुयश जाधव याने व्यक्त केला. देशात व देशाबाहेर झालेल्या विविध स्पर्धेत आपण सातत्याने यश मिळवलेले आहे. त्यामुळे या सर्वाेच्च स्पर्धेत आपण आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करू.
- सुयश जाधव