हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकचा 7-1 नं उडवला धुव्वा
By Admin | Published: June 18, 2017 08:21 PM2017-06-18T20:21:24+5:302017-06-18T20:31:52+5:30
हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा 7-1 ने धुव्वा उडवला आहे.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा 7-1 ने धुव्वा उडवला आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत पाकिस्तानसमोर अडखळला असताना दुसरीकडे हॉकीत मात्र भारताच्या हॉकीपटूंनी जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानी संघाला चारीमुंड्या चीत केले.
एकतर्फी झालेल्या या लढतीत भारतीय आघाडीवीरांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर हुकूमत गाजवली. हरमनप्रीतने केलेले दोन गोल आणि तलविंदर सिंगच्या दोन गोलांच्या जोरावर भारताने मध्यांतरालाच 4-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताकडून आकाशदीपनं 2 तर प्रदीप मोरनं केलेल्या एक गोलमुळे भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानसाठी मोहम्मद भुट्टाने एकमेव मैदानी गोल झळकावला.
तत्पूर्वी भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत हॉकी विश्व लीग सेमी फायनलमध्ये कॅनडाचा 3-0 असा धुव्वा उडवताना आपला सलग दुसरा विजय नोंदवला होता. भारतासाठी एस. व्ही. सुनीलने पाचव्या मिनिटाला, आकाशदीपसिंहने 10व्या मिनिटाला आणि सरदारसिंह याने 18व्या मिनिटाला गोल करीत ब गटाच्या सामन्यात पूर्ण तीन गुण मिळवून दिले होते. भारताने गुरुवारी सुरुवातीच्या लढतीत स्कॉटलंडवर 4-1 गोलने दणकेबाज विजय नोंदवला होता. आता उपांत्य फेरीतही भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.