उपांत्य फेरी आमचे पहिले लक्ष्य आहे
By admin | Published: June 22, 2017 01:10 AM2017-06-22T01:10:27+5:302017-06-22T01:10:27+5:30
‘आगामी आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असेल. या स्पर्धेत चमकदार कामगिरीसह सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठण्याचे आमचे पहिले लक्ष्य आहे,
लंडन : ‘आगामी आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असेल. या स्पर्धेत चमकदार कामगिरीसह सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठण्याचे आमचे पहिले लक्ष्य आहे,’ असे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले. शनिवारपासून इंग्लंडमध्ये महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चौरंगी मालिकेमध्ये भारताची झालेली शानदार कामगिरी पाहता मिताली राजने चमकदार कामगिरीची आशा व्यक्त केली आहे.
मितालीने म्हटले, ‘‘चौरंगी मालिकेमध्ये शानदार कामगिरीसह आमचा आत्मविश्वास उंचावला
आहे. संघ समतोल असून आम्ही भूतकाळातील कामगिरीवर अवलंबून राहणार नाही. आमचे पहिले लक्ष्य विश्वचषक उपांत्य फेरी गाठण्याचे आहे. मात्र, यासाठी आम्हाला संपूर्ण स्पर्धेत चांगली व सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.’’(वृत्तसंस्था)
सराव सामन्यात
भारतीय महिला विजयी
चेस्टरफील्ड : कर्णधार मिताली राज (८५), पूनम राऊत (६९), स्मृती मानधना (४४) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात १०९ धावांनी विजय नोंदविला. भारतीय महिलांनी ५० षटकांत ८ बाद २७५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा डाव १६६ धावांत संपुष्टात आला.