बडोदा, तामिळनाडू उपांत्य फेरीत
By admin | Published: March 13, 2017 03:28 AM2017-03-13T03:28:11+5:302017-03-13T03:28:11+5:30
कृणाल पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बडोदा संघाने विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या
नवी दिल्ली : कृणाल पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बडोदा संघाने विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत कर्नाटकचा ७ गडी राखून पराभव केला. आता बडोदा संघाची उपांत्य फेरीत गाठ तामिळनाडू संघासोबत पडणार आहे.
कर्नाटकने दिलेल्या २३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बडोदा संघाने सालमीवीर केदार देवधर (७८) व पंड्या (७०) यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर विजयासाठी आवश्यक धावा ४५.५ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. जाधव व पंड्या यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. दीपक हुड्डाने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. देवधरने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व २ षटकार ठोकले. पंड्याने ७९ चेंडूंच्या खेळीमध्ये ५ चौकार व १ षटकार लगावला.
त्याआधी, पवन देशपांडे (५४), रवी समर्थ (४४) व मयंक अग्रवाल (४०) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानानंतरही कर्नाटकचा डाव ४८.५ षटकांत २३३ धावांत संपुष्टात आला. बडोदा संघातर्फे पंड्या सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६ षटकांत ३२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. इरफान पठाण, अतीत सेठ, लुकमान मेरीवाला व स्वप्नील सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
बडोदा संघाला उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पालम मैदानावर आज खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत तामिळनाडूने गुजरातचा ५ गडी राखून पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या गुजरात संघाचा डाव ४९.४ षटकांत २११ धावांत संपुष्टात आला. तामिळनाडूतर्फे विजय शंकर (३-४८), राहिल शाह (२-३४) व आर. साई किशोर (२-३५) यांची गोलंदाजीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली.
गुजरात संघातर्फे रुजुल भटने सर्वाधिक नाबाद ८३ धावांची खेळी केली. त्याने ९८ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकार व २ षटकार लगावले. सलामीवीर समित गोहेलने ३९ धावांचे योगदान दिले. त्याला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता आली नाही. प्रत्युत्तरात खेळताना सलामीवीर व्ही. गंगा श्रीधर राजू (८५) याच्या खेळीच्या जोरावर तामिळनाडूने विजयासाठी आवश्यक धावा ४६ चेंडू व ५ गडी राखून पूर्ण केल्या.
श्रीधर राजूने ९५ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार लगावले. बाबा अपराजितने ३४ धावांचे योगदान दिले तर एम. मोहम्मदने ३३ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या.
बडोदा व तामिळनाडू संघांदरम्यान उपांत्य फेरीची लढत १६ मार्च रोजी फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये रंगणार आहे. (वृत्तसंस्था)