सेमीफायनल दिल्लीतच!
By admin | Published: March 24, 2016 01:32 AM2016-03-24T01:32:17+5:302016-03-24T01:32:17+5:30
टी-२० विश्वचषकाची सेमीफायनल लढत आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार ३० मार्च रोजी येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळली जाईल.
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाची सेमीफायनल लढत आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार ३० मार्च रोजी येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळली जाईल. यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेले अनिश्चिततेचे सावट संपुष्टात आले आहेत.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममधील वादग्रस्त आर.पी. मेहरा ब्लॉकचे ‘उपयुक्तता प्रमाणपत्र’ या ब्लॉकचे प्रमाणपत्र न मिळाल्याने सामन्याच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह लागले होते. डीडीसीएला मंजुरी प्रमाणपत्र देण्यासाठी बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने डीडीसीएचे पर्यवेक्षक असलेले माजी न्या. मुकुल मुद्गल आणि डीडीसीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मंजुरी प्रदान केली.
बैठकीची माहिती देताना डीडीसीएचा एक अधिकारी म्हणाला,‘डीडीसीएला २०१७ पर्यंत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा सामना नव्हे तर आयपीएलचे सर्वच सामने विनाअडथळा पार पडतील. सामन्याच्या आयोजनात कुठलाही कायदेशीर अडसर येणार नाही, असे मुद्गल यांना पटवून देण्यात डीडीसीएचे अधिकारी यशस्वी ठरले.
न्या. मुद्गलसोबत बैठकीच्यावेळी डीडीसीएचे कार्यकारी अध्यक्ष चेतन चौहान, कोषाध्यक्ष रवींदर मनचंदा आणि आयसीसीचे कायदेशीर सल्लागार उपस्थित होते. मेहरा ब्लॉकची क्षमता दोन हजार इतकी आहे. कोटलावर आतापर्यंत टी-२० विश्वचषकाचे जे सामने झाले त्यावेळी या ब्लॉकचा उपयोग करण्यात आला नव्हता.(वृत्तसंस्था)