उपांत्य फेरी रंगतदार होणार

By Admin | Published: March 23, 2015 01:44 AM2015-03-23T01:44:39+5:302015-03-23T01:44:39+5:30

विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आठ सर्वोत्तम संघांदरम्यानच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती एकतर्फी ठरल्यानंतर, आता उपांत्य फेरीच्या लढती रंगतदार होण्याची आशा आहे.

The semifinal round will be colorful | उपांत्य फेरी रंगतदार होणार

उपांत्य फेरी रंगतदार होणार

googlenewsNext

चारही संघ तुल्यबळ : भारत आॅस्ट्रेलियाशी, तर न्यूझीलंड भिडणार दक्षिण आफ्रिकेशी
नवी दिल्ली : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आठ सर्वोत्तम संघांदरम्यानच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती एकतर्फी ठरल्यानंतर, आता उपांत्य फेरीच्या लढती रंगतदार होण्याची आशा आहे.
उपांत्यपूर्व फेरीत चारही सामने एकतर्फी झाले. उपांत्य फेरीत गतविजेत्या भारतीय संघाला सहयजमान आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही लढत २६ मार्चला सिडनीमध्ये खेळली जाणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि दुसरा सहयजमान असलेल्या न्यूझीलंड संघांदरम्यान २४ मार्चला आॅकलंडमध्ये पहिली उपांत्य लढत रंगणार आहे. उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांची स्पर्धेतील कामगिरी बघता आगामी सामने रंगतदार होतील, अशी आशा आहे. उपांत्य फेरीतील विजेत्या संघांदरम्यान २९ मार्चला मेलबोर्नमध्ये जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे.
उपांत्य फेरी गाठताना भारत व न्यूझीलंड संघांनी एकही सामना गमावलेला नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघांनी ७ पैकी प्रत्येकी ५ सामने जिंकले आहेत. आॅस्ट्रेलियाचा एक सामना अनिर्णीत राहिला होता. आकडेवारीचा विचार करताना भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान यापूर्वी ११७ सामने खेळले गेलेले आहेत. त्यापैकी भारताने ४०, तर आॅस्ट्रेलियाने ६७ सामने जिंकले आहेत. भारताने २०११ च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाचा पराभव केला होता, हे विशेष.
आॅस्ट्रेलियाने १९७५, १९८७, १९९६, १९९९, २००३ आणि २००७ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. या आकडेवारीचा विचार करता उपांत्य फेरीत संघर्षपूर्ण खेळ बघण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे.
भारत-आॅस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या लढतीत एका बाजूला शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे दिग्गज फलंदाज राहणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला आॅस्ट्रेलियातर्फे डेव्हिड वॉर्नर, मायकल क्लार्क, स्टिव्हन स्मिथ, शेन वॉटसन आणि मॅक्सवेल यांचे आव्हान राहील.
गोलंदाजीमध्येही उभय संघांदरम्यान चांगली लढत होईल. भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहित शर्मा आणि आॅस्ट्रेलियाचे गोलंदाज मिशेल स्टार्क, मिशेल जॉन्सन आणि जोश हेजलवुड या लढतीमध्ये निर्णायक भूमिका बजावतील. फिरकीपटूंमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन आणि आॅस्ट्रेलियाचा कामचलाऊ गोलंदाज मॅक्सवेल यांच्यादरम्यान वर्चस्वासाठी चुरस असेल.
आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांना मायदेशात उपांत्य फेरीचे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना समर्थकांचा पाठिंबा मिळणार असल्याचे निश्चित आहे. भारतीय संघ मात्र गेल्या चार महिन्यांपासून आॅस्ट्रेलियात आहे. भारतीय संघ येथील वातावरणासोबत समरस झालेला आहे, याची आॅस्ट्रेलिया संघाला चांगली कल्पना आहे. (वृत्तसंस्था)

४भारतीय संघाने १९८३, २००३ आणि २०११ मध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे.
४चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला चारदा जेतेपद पटकावणाऱ्या व सातव्यांदा अंतिम फेरी गाठण्यास उत्सुक असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

भारताला आॅस्ट्रेलियात भरघोस पाठिंबा मिळत आहे. हजारो भारतीय पाठीराखे आॅस्ट्रेलियात टीम इंडियाचा उत्साह वाढवित आहेत. एससीजीवर निळ्या सागराच्या लाटांमुळे आॅस्ट्रेलियावर दडपण येण्याची शक्यता आहे.

कोहलीकडून ‘विराट’ कामगिरीची आशा
विश्वकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाला गुरुवारी सहयजमान आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत स्टार फलंदाज विराट कोहलीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
विराटने विश्वकप स्पर्धेत सलामी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १०७ धावांची चमकदार खेळी केली होती. विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळविला होता. त्यानंतर मात्र विराटला मोठी खेळी करता आलेली नाही.
भारताने सलग सात सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळविल्यामुळे विराटच्या कामगिरीबाबत विशेष चर्चा झाली नाही, पण उपांत्य फेरीच्या लढतीत स्टार फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विराटची पाठराखण करताना तो मोठ्या लढतीचा खेळाडू असल्याचे म्हटले आहे.
विश्वकप स्पर्धेत पहिल्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर विराटला अन्य सामन्यांत विशेष छाप सोडता आलेली नाही.
४विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४६, यूएईविरुद्ध नाबाद ३३, वेस्ट इंडिजविरुद्ध ३३, आयर्लंडविरुद्ध नाबाद ४४ आणि झिम्बाब्वेविरुद्ध ३८ धावांची खेळी केली. उपांत्यपूर्व फेरीत बांगलाविरुद्ध विराटला केवळ ३ धावा करता आल्या.
आक्रमक खेळीसाठी ओळखला जाणारा विराट आॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीत फलंदाजीसाठी येईल त्यावेळी त्याच्यासाठी १५८ व्या लढतीतील १५० वा डाव राहील. या लढतीत तो संस्मरणीय खेळी करण्यास प्रयत्नशील असेल.
विराटने आतापर्यंत १५७ सामन्यांत ५१.८७ च्या सरासरीने ६,५३६ धावा फटकावल्या आहेत. त्यात २२ शतक आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटने कारकिर्दीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध १७ सामन्यांत ५१.६६ च्या सरासरीने ६२० धावा फटकावल्या आहेत.
त्यात तीन शतके व दोन अर्धशतकांचा समावेश आहे.


विराट खराब फलंदाजी करीत आहे किंवा त्याची फटक्यांची निवड चुकीची आहे, असे मला वाटत नाही. तो दर्जेदार फलंदाज असून फटकेबाजी करण्यास सज्ज असतो. संधी मिळाली म्हणजे तो धावा फटकावतो. प्रत्येक लढतीत त्याच्याकडून शतकाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. विराट सातत्याने कामगिरीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. - महेंद्रसिंग धोनी

Web Title: The semifinal round will be colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.