आशियाडमध्ये भारताचा फुटबॉल संघ पाठवा, पंतप्रधानांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 07:45 AM2023-07-18T07:45:34+5:302023-07-18T07:46:14+5:30
राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीमक यांची पंतप्रधानांना विनंती
नवी दिल्ली : निवड प्रक्रिया पूर्ण न केल्यानंतरही आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रतिनिधित्वासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टीमक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) याआधी स्टीमक यांच्या मार्गदर्शनाखाली २३ वर्षांखालील भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळविण्याची योजना आखली होती.
भारतीय फुटबॉल संघ अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या पात्रतेला पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा सहभाग होणे कठीण आहे. स्टीमक यांनी सोशल मीडियावर मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग करून लिहिले की, ‘मी तुमच्या लक्षात आणू इच्छितो की २०१७ सालच्या आपल्या १७ वर्षांखालील संघाने २३ वर्षांखालील विश्वचषक पात्रता स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले. हा संघ खूप गुणवान असून, आता या संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेपासून दूर ठेवण्यात येत आहे. हा संघ या स्पर्धेत खेळणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेबाहेर राहण्यासाठी जे कारण सांगितले जात आहे, ते अयोग्य आहे आणि भारताच्या राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक म्हणून याबाबतची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे मला महत्त्वाचे वाटते.’
भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) पाठविलेल्या पत्रात क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘सांघिक स्पर्धांमध्ये केवळ अशाच खेळांमध्ये सहभाग असावा, ज्यात आशियाई देशांमध्ये गेल्या एक वर्षात भारताने अव्वल आठ क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे.’
भारतीय फुटबॉल संघ सध्या आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) देशांमध्ये १८व्या स्थानावर आहे. स्टीमक यांनी पुढे लिहिले की, ‘आपले मंत्रालय रँकिंगचा सदर्भ देत स्पर्धेत सहभागी होण्यास नकार देत आहे, पण खरं म्हणजे आपल्या फुटबॉल संघाची रँकिंग इतर खेळातील संघांच्या तुलनेत चांगली आहे. इतिहास आणि आकडेही साक्षीदार आहेत की, फुटबॉल असा खेळ आहे, ज्यामध्ये कमी रँकिंगवाला संघही आघाडीच्या संघाला नमविण्याची कामगिरी करतो.’