पत्रकारितेतला "अष्टपैलू खेळाडू" हरपला; ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 02:19 PM2019-12-14T14:19:47+5:302019-12-14T14:20:14+5:30

गेले वर्षभर अनिल जोशी यांची प्रकृती ढासळत चालली होती, तरीही त्यांनी आपले क्रीडा विषयक लिखाण थांबवले नव्हते.

Senior journalist Anil Joshi dies at mumbai | पत्रकारितेतला "अष्टपैलू खेळाडू" हरपला; ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांचे निधन

पत्रकारितेतला "अष्टपैलू खेळाडू" हरपला; ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांचे निधन

Next

पत्रकारितेत सर्व विषयांवर सहजपणे परखड लिखाण करणारे अष्टपैलू पत्रकार, आपला वार्ताहरचे क्रीडा संपादक आणि सर्व देशी खेळांना न्याय देणारे ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांचे आज पहाटे 4 वाजता निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नैला आणि मुलगा प्रसाद असा परिवार आहे. 

गेले वर्षभर अनिल जोशी यांची प्रकृती ढासळत चालली होती, तरीही त्यांनी आपले क्रीडा विषयक लिखाण थांबवले नव्हते. 8 डिसेंबरला त्यांनी क्रीडाक्षेत्रातही भावनेचा उद्रेक हा आपल्या "क्रीडाक्षेप" या सदरात लेख लिहिला. तो त्यांचा अखेरचा लेख ठरला. त्यांनी आपला वार्ताहरच्या गेल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत "क्रीडाक्षेप" सदरात 4 हजारांपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. हा क्रीडा पत्रकारितेतील एक विक्रमच म्हणावा लागेल.
1975 सालापासून सकाळमधून सुरू झालेली पत्रकारिता 44 वर्षानंतरही अविरतपणे त्याच झपाट्याने सुरू ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार आणि आताचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार म्हणजेच अनिल जोशी. हीच त्यांची खरी ओळख. त्यांना पत्रकारितेतून निवृत्त व्हायचे होते, पण त्यांच्या प्रकृतीनेच त्यांना दगा दिला आणि निवृत्तीआधीच त्यांना मुक्त केले. जोशी यांच्या आकस्मिक निधनाने क्रीडाक्षेत्राची अपरिमित हानी झालीच आहे, पण देशी खेळांना आपल्या लिखाणाने न्याय मिळवून देणारा आपला माणूस हरपल्याची भावना उमटली आहे.

वेगवेगळ्या बीटच्या वार्तांकनाची जबाबदारी सोपविण्यात आली अशा अनिल जोशींनी पत्रकारितेतील एकही क्षेत्र सोडले नाही. व्यापारापासून सिनेमापर्यंत, राजकारणापासून खेळापर्यंतचे सारे क्षेत्र त्यांनी अक्षरश: पिंजून काढले. 44 वर्षांच्या दीर्घ कालखंडात मुंबई सकाळ आणि लोकसत्ता या दोन लोकप्रिय दैनिकांमध्ये या अवलियाची कारकीर्द बहरली. त्यानंतर त्यांनी नवशक्ती, सामनासह अनेक दैनिकांमध्ये वृत्त संपादक ते सहसंपादकपर्यंत अनेक संपादकीय जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. मात्र त्यांनी आपला वार्ताहर दैनिकात क्रीडा विभागाचे आव्हान स्वीकारल्यानंतर सुरू केलेले क्रीडा लिखाण चौदा वर्षानंतरही अविरतपणे कायम होते. 

आजवर त्यांनी सातत्यपूर्ण चार हजारांपेक्षा अधिक क्रीडा लेख आणि मुलाखती आपल्या सदरात प्रसिद्ध केल्या. हा एक प्रकारे विक्रमच म्हणावा लागेल. त्यांनी आपल्या निर्भीड शैलीतून अनेकांची कारकीर्द रूळावर आणली तर अनेकांना सोलूनही काढले. त्यांच्या लिखाणाचा अनेकांनी धसकासुद्धा घेतला. कुस्ती, कबड्डी, शरीरसौष्ठव, मल्लखांब, खो-खोसारख्या खेळांवर त्यांनी इतकं प्रचंड लिखाण केलंय की त्या लेखांना एकत्रित केलं तर त्यांचे अक्षरश: खंड होतील. वयाच्या सत्तरीतही वेड्यासारखं भन्नाट क्रीडा लिखाण करणाऱ्या या पत्रकाराचा मराठी क्रीडा पत्रकार संघाच्या वतीने नुकताच जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता. गेल्या 14 वर्षात त्यांना युआरएल फाऊंडेशन, विचारे प्रतिष्ठानसह किमान 18 संस्थानी त्यांचा गौरव केला आहे.

Web Title: Senior journalist Anil Joshi dies at mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई