सिंधुदुर्गात रंगणार वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा, लक्ष्य विश्व अजिंक्यपद स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:12 PM2019-02-18T12:12:07+5:302019-02-18T12:12:27+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याताली कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे मंगळवार पासून ४७ वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतर - राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याताली कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे मंगळवार पासून ४७ वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतर - राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारतातून २५ राज्य व १३ संस्थांच्या तब्बल २८८ पुरुष व १९५ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. भारतातून जवळपास ४० राष्ट्रीय व आंतर - राष्ट्रीय पंच तसेच प्रशिक्षक व राष्ट्रीय व राज्य संघटनेचे अधिकारी असे मिळून एकंदर ६५० जणांचा चमू या स्पर्धेकरिता कुडाळमध्ये दाखल होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर हे या स्पर्धला हजर राहणार आहेत. अखिल भारतीय महाससंघ आयोजित या स्पर्धेचे यजमानपद यंदा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनला मिळाले आहे. विद्यमान विश्वविजेता प्रशांत मोरे व महिला विश्वविजेती एस. अपूर्वा हे या स्पर्धेचे मुख आकर्षण असून त्यांच्या सोबत माजी विश्वविजेते आर. एम. शंकरा ( एअर इंडिया ), रश्मी कुमारी योगेश परदेशी व आय. इलवझकी ( सर्व पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) बरोबरच जवळपास २० आंतर - राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
यामध्ये रियाझ अकबरअली, एम. नटराज ( एअर इंडिया ), काजल कुमारी, एस. श्रीनिवास, महम्मद घुफ्रान, रमेश बाबू, परिमला देवी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ), अनुपमा केदार, नागसेन एटंबे, राजू कटारे, संजय नागावकर ( बँक ऑफ इंडिया ), राजू भैसारे, जितेंद्र काळे (कॅग ), परिमी निर्मला, प्रकाश गायकवाड ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ), आयेशा महम्मद ( जैन इरिगेशन ), झहीर पाशा, संगीता चांदोरकर, कविता सोमांची, हिदायत अन्सारी ( रिझर्व्ह बँक ) या प्रमख खेळाडूंचा समावेश आहे.
पुढील वर्षी मलेशिया येथे कॅरमची ५ वी विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धा होणार असल्याने संघ निवडीसाठी या स्पर्धेची कामगिरीही विचारात घेतली जाणार असल्याचे अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या महासचिव भारतीय नारायण यांनी सांगितले. स्पर्धेकरिता होणाऱ्या गर्दीची दखल घेत स्पर्धेच्या हॉलमध्ये एल. इ. डी. स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्या व्यतिरिक्त इतरही काही महत्वाचे सामने कॅरम रसिकांसाठी दररोज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtrcarromasociation या युट्युब च्यानलवरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.