ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी, आंतरराष्ट्रीय धावपटू स्वाती गाढवे यांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:27 PM2018-12-22T17:27:15+5:302018-12-22T17:27:41+5:30
शिव छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. प्रल्हाद सावंत यांच्या स्मृती क्रीडा पत्रकारिता पुरस्कार यंदापासून सुरु करण्यात आला आहे.
मुंबईः अॅथेलॅटीक्स, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन व इतर खेळासाठी प्रोत्साहन देणारे शिव छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. प्रल्हाद सावंत यांच्या स्मृती क्रीडा पत्रकारिता पुरस्कार यंदापासून सुरु करण्यात आला आहे. या पहिल्या क्रीडा पत्रकारिता पुरस्काराचे मानकरी मुंबईचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी ठरले आहे. विनायक दळवी यांना यंदापासून मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आलेला प्रतिष्ठेचा ज्येष्ठ क्रीडा संपादक स्व. आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पत्रकारिता पुरस्कार देखील मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय महिला हॉकी क्रीडा संयोजिका पुण्याची अर्नवाज दमानिया व आंतरराष्ट्रीय धावपटू स्वाती गाढवे यांना देखील प्रल्हाद सावंत स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा पत्रकारिता, क्रीडा संयोजक व क्रीडा नैपुण्य यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींसाठी कै. प्रल्हाद सावंत स्मृती पुरस्कार देण्याचे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट, पुणे जिल्हा अॅथेलॅटीक्स संघटना यांनी ठरवून तीन व्यक्तींची निवड पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड यांनी जाहीर केली. कै.प्रल्हाद सावंत स्मृतीचिन्ह व रोख रुपये पंचवीस हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळा २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा. मॅरेथॉन भवन, मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे येथे होणार आहे. सदर समारंभ विजय कुवळेकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार वंदना चव्हाण, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार अनिल भोसले व आमदार शरद रणपिसे उपस्थित राहणार आहेत.