सीनिअर्सनी टीकाकारांना गप्प केले

By admin | Published: January 22, 2017 04:22 AM2017-01-22T04:22:45+5:302017-01-22T04:22:45+5:30

गेल्या वर्षभरात भारतीय कर्णधार विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, तो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे. कटकमध्ये तो अपयशी

Seniors made the commentators silent | सीनिअर्सनी टीकाकारांना गप्प केले

सीनिअर्सनी टीकाकारांना गप्प केले

Next

- सुनील गावस्कर लिहितो...

गेल्या वर्षभरात भारतीय कर्णधार विराट कोहलीची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, तो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे. कटकमध्ये तो अपयशी ठरल्यानंतर भारतीय क्रिकेटच्या जुन्या शिलेदारांनी डाव सावरला. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. चाहत्यांना ज्या अपेक्षा तेंडुलकरकडून होत्या अगदी त्याच अपेक्षा आता कोहलीकडून असतात. युवराज आणि धोनीबाबतही चाहत्यांचे काही भावबंध जुळलेले आहेत. या दोघांनी अनेक लढतींमध्ये भारताला विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे चाहते या दिग्गजांकडून चमकदार फलंदाजीची अपेक्षा करीत असतात. कटकमध्ये त्यांनी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. ते करताना त्यांनी भारताला अडचणीच्या स्थितीतून सावरले. त्यांनी आक्रमक फलंदाजी करताना अतिरिक्त धावा वसूल केल्या आणि अखेर याच धावांनी जय-पराजयातील अंतर स्पष्ट केले.
कर्णधाराने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ख्रिस व्होक्सने नव्या चेंडूने अचूक स्विंग मारा केला आणि त्याचे त्याला बक्षीसही मिळाले. त्याने झटपट तीन बळी घेतले. त्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या विकेटचाही समावेश होता. अचूक टप्प्यावर मारा करताना धोनीला सुरुवातीला जखडून ठेवण्यात इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. अनुभवी धोनीला संथ सुरुवातीची नंतर कशी भरपाई करायची याचा चांगला सराव आहे. जम बसल्यानंतर त्याच्या भात्यात असलेल्या फटक्यांच्या जोरावर तो स्टाईक रेट वाढविण्यात वाक्बगार आहे.
इंग्लंड कसोटी संघाने काही योजना निश्चित केल्या होत्या. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असताना आॅफ स्पिनरला गोलंदाजीसाठी पाचारण करायचे आणि बेन स्टोक्सला चेंडू जवळजवळ ३५ षटके जुना झाल्यानंतर गोलंदाजी द्यायची. वन-डे संघाची कामगिरी चांगली ठरत आहे कारण, ते परिस्थितीनुरूप खेळतात आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये योजनेपेक्षा परिस्थितीला अधिक महत्त्व असते. युवराज आखूड टप्प्याच्या माऱ्याविरुद्ध सहज नसल्याचा इतिहास बघता त्याच्याविरुद्ध पुन्हा एकदा योजनेचा वापर झाल्याचे निदर्शनास आले. युवराजने मात्र जॅक बॉल आणि प्लंकेटच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत इंग्लंडची योजना अपयशी ठरवली. ही योजना यशस्वी ठरण्यासाठी या गोलंदाजांना नव्या चेंडूने मारा करण्याची संधी मिळाली नाही. ते गोलंदाजीला आले त्या वेळी फलंदाजांचा जम बसला होता. युवराजने त्या आखूड टप्प्याच्या माऱ्याचा खरपूस समाचार घेतला. डावाच्या तिसाव्या षटकापर्यंत धोनीची बॅकलिफ्ट संथ होती. यावेळी त्याने जम बसवला आणि त्यानंतर फटकेबाजी केली. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर या दोन्ही दिग्गजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे विखुरली.
इंग्लंडनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. रॉय व रुट यांनी पुन्हा एकदा
आपल्या फटक्यांची मुक्तहस्ते उधळण केली. भारतीय संघ रुट माघारी परतण्याची प्रतीक्षा करीत होता.
त्याने वैयक्तिक अर्धशतकाची वेस ओलांडल्यानंतर भारताची प्रतीक्षा संपली. जडेजाच्या एका शानदार चेंडूवर रॉयची खेळी संपुष्टात आली. आश्विनने चांगला मारा करताना
तीन बळी घेतले. इंग्लंड संघ
लढवय्या आहे. मॉर्गनने चमकदार खेळी करीत इंग्लंडच्या आशा कायम राखल्या होत्या. तो धावबाद झाल्यामुळे त्याची खेळी संपुष्टात आली. त्याने शतकी खेळी करीत त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना गप्प केले. कटकमध्ये आपल्या कामगिरीच्या आधारावर सीनिअर्सनी टीकाकारांना गप्प केले. (पीएमजी)

Web Title: Seniors made the commentators silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.