पहिल्याच सामन्यात सात्त्विक-अश्विनी जोडीचा सनसनाटी विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:50 AM2021-03-04T04:50:04+5:302021-03-04T04:50:11+5:30
स्वीस ओपन बॅडमिंटन
बासेल : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने बुधवारी आपल्याच देशाच्या समीर वर्मा याचे आव्हान संपुष्टात आणत स्वीस ओपन सुपर ३०० स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय मिश्र दुहेरीच्या जोडीनेदेखील धडाकेबाज सुरुवात करीत इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमॅनुअल विदजाजा या द्वितीय मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवला.
आता जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावरील श्रीकांतची लढत फ्रान्सच्या थॉमस रुक्सेल आणि कॅनडाच्या जियाडोंग शेंग यांच्यादरम्यान होणाऱ्या लढतीतील विजयी खेळाडूशी होईल. दरम्यान, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय मिश्र दुहेरीच्या जोडीने सुरुवातीच्या फेरीत इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमॅनुअल विदजाजा या द्वितीय मानांकित आणि जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकावरील जोडीचा २१-१८, २१-१० असा सनसनाटी पराभव केला.
गत एका महिन्यापासून परदेशी प्रशिक्षक कोच माथियास बो यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेणाऱ्या सात्त्विक आणि अश्विनी या जोडीची लढत आता एक अन्य इंडोनेशियाची जोडी रिनोव रिवाल्डी आणि पिठा हॅनिंगटायस मेंटारी यांच्याशी होईल. तथापि, अन्य भारतीय खेळाडू प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या मिश्र दुहेरीच्या जोडीला इंग्लंडच्या मार्कस एलिस आणि लॉरेन स्मिथ या तृतीय मानांकित जोडीकडून ३९ मिनिटांत १८-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला.
२०१५ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या चौथ्या मानांकित श्रीकांतने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात एका तासापेक्षा जास्त वेळ रंगलेल्या चुरशीच्या लढतीत आपलाच सहकारी २०१८ चा विजेता समीर वर्मा याचा १८-२१, २१-१८, २१-११ असा पराभव केला.