सेरेनाची चौथ्या फेरीत धडक, स्टिफन्सवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:41 AM2020-09-07T00:41:45+5:302020-09-07T00:41:52+5:30
२२ वर्षांपूर्वी अमेरिकन ओपनमध्ये पदार्पणानंतर या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनावर लवकर बाहेर पडण्याचे संकट घोंघावत होते
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू सेरेना विलियम्सने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना माजी चॅम्पियन स्लोएन स्टिफन्सचा पराभव करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला.
२२ वर्षांपूर्वी अमेरिकन ओपनमध्ये पदार्पणानंतर या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनावर लवकर बाहेर पडण्याचे संकट घोंघावत होते, पण सहा वेळच्या या माजी चॅम्पियन खेळाडूने अंतिम १२ पैकी १० गेम जिंकत मायदेशातील सहकारी स्टिफन्सचा २-६, ६-२, ६-२ ने पराभव केला.
शनिवारी सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये सेरेनाची तीन वर्षांची कन्या आॅलिम्पिया उपस्थित होती. मास्क घालून आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेल्या आॅलिम्पियाने विजयानंतर आपल्या आईचे हात उंचावत अभिनंदन केले. सेरेनाही लॉकर रूमकडे परतताना आपल्या मुलीकडे बघून हात उंचावले.
पुढील फेरीत सेरेनाला यूनानच्या मारिया सकारीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मारियाने अमेरिकेच्या १९ वर्षीय अमांडा एनिसिमोव्हाचा ६-३, ६-१ ने पराभव केला. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सेरेना म्हणाली, आशा आहे आॅलिम्पियाने आपल्या आईला आव्हान देताना बघितले असेल. आपल्या भेदक सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या सेरेनाने या लढतीत १२ एस लगावले.
सेरेनाविरुद्ध सातपैकी सहाव्या लढतीत पराभव स्वीकारणारी २०१७ची अमेरिकन ओपन चॅम्पियन स्टिफन्स म्हणाली, सेरेनाने शानदार सर्व्हिस केली. ती खरच या खेळातील सर्वात चांगल्या सर्व्हिस करणाºया खेळाडूंपैकी एक आहे. सेरेनावर एकवेळ पराभवाचे संकट होते. पण, तिने अखेरच्या १२ पैकी १० गेम्समध्ये बाजी मारत जोरदार पुनरागमन करीत बाजी मारली. अन्य लढतींमध्ये १६ व्या मानांकित एलिस मर्टेन्स, २० वे मानांकनप्राप्त कॅरोलिन मुकोवा व स्वेताना पिरोनकोव्ह यांनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत चौथी फेरी गाठली.
स्वेतानाने धक्कादायक निकाल नोंदवताना १८ व्या मानांकित डोना वेकिचचा ६-४, ६-१ ने पराभव केला.पुरुष विभागात २०१९ चा उपविजेता डेनिल मेदवेदेव व सहावा मानांकित मातियो बेरेटनी यांनी विजय नोंदवला. (वृत्तसंस्था)
बोपन्ना-शापोवालोव्ह जोडी उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा अनुभवी खेळाडू रोहन बोपन्ना व त्याचा कॅनडाचा सहकारी डेनिस शापोवालोव्ह जोडीने सहाव्या मानांकित केव्हिन क्राविट््ज व आंद्रियास मिएस जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
४भारत व कॅनडाची बिगरमानांकित जोडीने शनिवारी झालेल्या दुसºया फेरीच्या लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करताना जर्मनच्या जोडीचा एक तास ४७ मिनिटांमध्ये ४-६, ६-४, ६-३ ने पराभव केला.
४बोपन्ना-शापोवालोव्ह जोडीला उपांत्यपूर्व फेरीत जीन ज्युलियन रॉजर व होरिया तेकाऊ जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सुमित नागल व दिविज शरण स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर बोपन्ना स्पर्धेत एकमेव भारतीय खेळाडू शिल्लक आहे. (वृत्तसंस्था)