सेरेना, मरे, रंदावास्का चौथ्या फेरीत
By admin | Published: July 4, 2016 05:50 AM2016-07-04T05:50:49+5:302016-07-04T05:50:49+5:30
ब्रिटनचा अँडी मरे आणि तृतीय मानांकित पोलंडची एग्निज्स्का रंदावास्का यांनी आगेकूच करताना चौथी फेरी गाठली.
लंडन : विम्बल्डनचा सनसनाटी निकालाची मालिका थांबविताना गत चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम, द्वितीय मानांकित ब्रिटनचा अँडी मरे आणि तृतीय मानांकित पोलंडची एग्निज्स्का रंदावास्का यांनी आगेकूच करताना चौथी फेरी गाठली.
आपल्या २२ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रयत्नात असणाऱ्या सेरेनाने दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या एनिका बेक हिचा ५१ मिनिटांत ६-३, ६-० असा सहज पराभव केला. सेरेनाला दुसऱ्या फेरीत तिच्याच देशाच्या क्रिस्टिना मॅकहेल हिला पराभूत करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला होता.
गत चॅम्पियन खेळाडूची चौथ्या फेरीत रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हा हिच्याविरुद्ध लढत होईल. स्वेतलाना हिने तिसऱ्या फेरीत १८ व्या मानांकित अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्स हिचे आव्हान ६-७, ६-२, ८-६ असे मोडीत काढले. दरम्यान, पुरुष गटात २०१३ चा विम्बल्डन चॅम्पियन आणि द्वितीय मानांकित मरे याने आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याचा ६-३, ७-५, ६-२ असा सलग सेटमध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सॅम क्वेरीकडून झालेल्या सनसनाटी पराभवानंतर मरे याच्या विजयाचे वृत्त आले. (वृत्तसंस्था)
>पेसचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात
लिएंडर पेस आणि पोलंडचा त्याचा जोडीदार मार्सिन मात्कोवस्की यांना जॉन पीयर्स आणि हेन्री कोंटिनेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.
पीयर्स व कोंटिनेन या फिनलँड आणि आॅस्ट्रेलियाच्या दहाव्या मानांकित जोडीने दुसऱ्या फेरीत पेस व मात्कोवस्की यांचा ६-३, ६-२ असा अवघ्या ६२ मिनिटांत पराभव केला. पीयर्स आणि कोंटिनेन यांची पुढील फेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाच्या फ्लोरिन मर्जिया या दहाव्या मानांकित जोडीविरुद्ध लढत होणार आहे.
>सानिया-हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्सर्लंडची मार्टिना हिंगीसने जर्मन जोडी अॅना लेना फ्रिडसॅम आणि एल. सेजमंड जोडीला ६-२, ७-५ असे पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानिया-हिंगीसने हा लढत एक तास २१ मिनिटांत जिंकली.
दुसरीकडे पुरुष दुहेरीत भारताचा रोहण बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियाने सहावी मानांकित जोडी स्लोवाकियाचा आंद्रेज मार्टिन आणि चिलीचा हेंस केस्टिलो या जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात ७-५, ६-२ असे नमविले.