सेरेना, नदालची शानदार सलामी

By admin | Published: January 18, 2017 04:14 AM2017-01-18T04:14:55+5:302017-01-18T04:14:55+5:30

राफेल नदाल यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करताना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Serena, Nadal's great salute | सेरेना, नदालची शानदार सलामी

सेरेना, नदालची शानदार सलामी

Next


मेलबोर्न : सेरेना विलियम्स व स्पॅनिश स्टार राफेल नदाल यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करताना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
दुखापतीमुळे काही महिने कोर्टपासून दूर असलेल्या सेरेनाने स्वित्झर्लंडची युवा स्टार बेलिंडा बेनसिचचा ६-४, ६-३ ने सहज पराभव केला. नदालने जर्मनीच्या फ्लोरिन मेयरविरुद्ध ६-३, ६-४, ६-४ ने सरशी साधली.
मेलबोर्न पार्कवर दिवसाचे तापमान ३७ अंश होते; पण यूएस ओपनच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर अधिक सामने न खेळणाऱ्या सेरेनाने पहिल्या फेरीत चमकदार कामगिरी करीत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला. बेनसिचने पहिल्या सेटमध्ये काहीअंशी आव्हान देण्याचा प्रयत्न केला; पण दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाच्या आक्रमक खेळापुढे तिचा निभाव लागला नाही.
अलीकडे रेडिटचे सहसंस्थापक अ‍ॅलेक्सिस ओहानियनसोबत साखरपुडा करणाऱ्या सेरेनाचे लक्ष्य २३वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावत स्टेफी ग्राफचा ओपन युगातील २२ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा विक्रम मोडण्याचे आहे.
सेरेनाची पुढच्या फेरीत गाठ चेक प्रजासत्ताकच्या लुसी सॅफरोव्हाविरुद्ध पडणार आहे. सॅफरोव्हाने यानिना विकमेयरची झुंज ३-६, ७-६, ६-१ ने मोडून काढली.
यूएस ओपनमध्ये सेरेनाचा पराभव करणाऱ्या पाचवे मानांकनप्राप्त चेक प्रजासत्ताकच्या कारोलिना पिलिसकोव्हाने स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोचा ६-२, ६-० ने धुव्वा उडविला. पिलिसकोव्हाला पुढच्या फेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या अन्ना ब्लिनकोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ब्लिनकोव्हाने रोमानियाच्या मोनिका निकोलेस्कूचा पराभव केला.
गेल्या आठवड्यात सिडनी इंटरनॅशनलमध्ये जेतेपद पटकावणारी नववे मानांकनप्राप्त ब्रिटिश खेळाडू कोंटाने बेल्जियमच्या ख्रिस्टीन फ्लिपकेन्सचा ७-५, ६-२ ने पराभव करीत पुढची फेरी गाठली.
ब्रिटनच्या हीथन वॉटसनने यूएस ओपनची माजी विजेता व १८वे मानांकनप्राप्त सामांता स्टोसूरची झुंज ६-३, ३-६, ६-० ने मोडून काढली, तर डोमिनका सिबुलकोव्हाने डेनिसा अलाटोंवाचा ७-५, ६-२ ने पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
१७वे मानांकनप्राप्त डेन्मार्कची कारोलिन व्होज्नियाकीने आॅस्ट्रेलियाच्या एरिना रोडियोनोव्हाचा ६-१, ६-२ ने सहज पराभव केला, तर १४वे मानांकनप्राप्त रशियाच्या इलेना वेसनिनाने रोमानियाच्या अन्ना बोगडनवर ७-५, ६-२ ने मात केली.
पुरुष विभागात तिसरे मानांकनप्राप्त कॅनडाचा मिलोस राओनिचने जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनचा ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. जर्मनीच्या अलेक्सांद्र जेवेरेव्हने रोबिन हॉसची झुंज पाच सेट््समध्ये ६-२, ३-६, ५-७, ६-३, ६-२ ने मोडून काढली.
० व्या मानांकित इव्हो कार्लोविचने अर्जेंटिनाच्या होरासियो जेबालोसविरुद्ध दोन सेट गमावल्यानंतर पुनरागमन केले. पाच तास १४ मिनिटे रंगलेल्या लढतीत कार्लोविचने ६-७, ३-६, ७-५, ६-२, २२-२० ने विजय मिळवला.
सहाव्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लीचा ६-२, ६-३, ६-२ ने, आठव्या मानांकित डोनिनिक थीमने जर्मनीच्या यान लेनार्ड स्ट्रफचा ४-६, ६-४, ६-४, ६-३ ने आणि १३वे मानांकनप्राप्त स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ताने अर्जेंटिनाच्या गुइडो पेलाचा ६-३, ६-१, ६-१ ने पराभव केला.
१८वे मानांकनप्राप्त फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटने आॅस्ट्रेलियाच्या ब्लॅक मोटचा ६-४, ६-४, ६-२ ने आणि २१व्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने आॅस्ट्रेलियाच्या ओमार जासिकाचा ६-३, ६-०, ६-२ ने पराभव केला. ११ व्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनला अमेरिकेच्या रीली ओपेल्काचा ६-४, ४-६, ६-२, ४-६, ६-४ ने पराभव करताना घाम गाळावा लागला. (वृत्तसंस्था)
>बेनसिच चांगली खेळाडू आहे. अलीकडेच तिला आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. मी पहिल्या फेरीमध्ये आतापर्यंत खेळलेल्या लढतींच्या तुलनेत ही सर्वांत खडतर लढत होती. सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक होते. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मी खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.
-सेरेना विलियम्स
>जोकोव्हिचला स्पेनच्या फर्नांडो वर्डास्कोविरुद्ध दुसऱ्या सेटमध्ये संघर्ष करावा लागला; पण दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या या खेळाडूने मोक्याच्या क्षणी गुण वसूल करीत ६-१, ७-६, ६-२ ने सरशी साधली. वर्डास्कोने गेल्या वर्षी नदालचा पहिल्या फेरीत पराभव केला होता.

Web Title: Serena, Nadal's great salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.