सेरेना, शारापोव्हा,मरे, वावरिंका क्वार्टर फायनलमध्ये
By admin | Published: July 7, 2015 01:16 AM2015-07-07T01:16:31+5:302015-07-07T01:16:31+5:30
सेरेना विलियम्स, मारिया शारापोव्हा, अॅन्डी मरे, स्टेन वावरिंका आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
लंडन : नंबर वन टेनिसपटू आणि अव्वल मानांकनप्राप्त अमेरिकेची सेरेना विलियम्स, चौथी मानांकित रशियाची मारिया शारापोव्हा, अॅन्डी मरे, स्टेन वावरिंका तर पुरूष दुहेरीत रोहन बोप्पणा व त्याचा जोडीदार फ्लोरिन मर्जिया यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सोमवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
सेरेनाने मोठी बहीण व्हिनसचा ६७ मिनिटांच्या खेळात ६-४, ६-३ ने सलग सेट्समध्ये पराभव केला. माजी विजेती शारापोव्हा हिने कझाकिस्तानची युवा खेळाडू झरिना डियास हिच्यावर १ तास ३६ मिनिटांत ६-४, ६-४ ने विजय साजरा केला. जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी पाच वेळेची चॅम्पियन सेरेनाने चौथ्या फेरीत मोठी बहीण व्हिनसला नमविले. पुरुष गटाच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात एक अपसेट घडला. बिगर मानांकित खेळाडू कॅनडाचा वासेक पोप्सिसिल याने २२ वा मानांकित सर्बियाचा व्हिक्टर ट्रायकी याच्यावर २ तास ३९ मि. चाललेल्या संघर्षात पाच सेट्समध्ये ४-६, ६-७, ६-४, ६-३, ६-३ ने सरशी साधली. दुसऱ्या एका लढतीत ब्रिटनच्या अँन्डी मरेने सुमारे ३ तास ०३ मि. चाललेल्या लढतीत क्रोएशियाच्या २३ वा मानांकित इवो कार्लोविचला ७-६(९-७), ६-४, ५-७, ६-४ असा पराभव केला. फ्रान्सचा रिचर्ड गास्के याने २६ वर्षांचा युवा आॅस्ट्रेलियन निक किर्गियोस याच्यावर २ तास ५३ मि. चार सेटमध्ये ७-५, ६-१, ६-७, ७-६ ने संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली.
महिला एकेरीत पोलंडच्या
अग्निस्जका रांदवांस्का ने सर्बियाच्या येलेना यांकोविच ला ७-५, ७-६ असे नमविले. (वृत्तसंस्था)
दुहेरीत बोपन्ना क्वार्टर फायनलमध्ये; पेस स्पर्धेबाहेर
>रोहन बोपन्ना याने विपरीत परिस्थितीत विजय मिळवून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. पण, लिएंडर पेस हा पाच सेटमधील संघर्षात पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला.
> बोपन्नाने रुमानियाचा फ्लोरिन मर्जियाच्या सोबतीने पोलंडचा लुकास कुबोट व बेलारुसचा मॅक्स मिर्नयी यांचा ३ तास १९ मिनिटांत ७-६, ६-७, ७-६, ७-६ नी पराभव केला.
> लिएंडर पेस आणि कॅनडाचा डॅनियल नेस्टर या जोडीला तिसऱ्या फेरीत आॅस्ट्रियाचा अलेक्झांडर पेया व ब्राझीलचा बूनो सोरेस यांच्याकडून ३-६, ५-७, ६-३, ६-२, २-६ नी पराभवाचा धक्का बसला.
सानिया-हिंगीस उपांत्यपूर्व फेरीत
> अव्वल मानांकित भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी सोमवारी शानदार विजय मिळवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
> अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने स्पेनच्या एनाबेल मेदिना गॅरिग्स व अरांशा पॅरा सांतोजा या १६ व्या मानांकित जोडीचा ६-४, ६-३ ने पराभव केला. विजेत्या जोडीने या लढतीत आठपैकी पाच ब्रेकपॉइंटवर गुण वसूल केले आणि चार विनर्स लगावले.
> स्पेनच्या जोडीने सहापैकी तीन ब्रेक पॉइंट वसूल केले. सानिया-हिंगीस जोडीने निर्णायक क्षणी कामगिरीचा दर्जा उंचावत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.