सेरेना सुपरचॅम्प
By admin | Published: January 31, 2015 11:25 PM2015-01-31T23:25:43+5:302015-01-31T23:25:43+5:30
रशियाच्या मारिया शारापोवाला ६-३, ७-६ असे सरळ सेटमध्ये हरवून आॅस्ट्रेलियन ओपनचे सहावे, तर कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
आॅस्ट्रेलियन ओपन : शारापोवाला हरवून जिंकले वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम
मेलबोर्न : अमेरिकेची टॉप सिडेड सेरेना विल्यम्स हिने आज येथे झालेल्या अंतिम सामन्यात रशियाच्या मारिया शारापोवाला ६-३, ७-६ असे सरळ सेटमध्ये हरवून आॅस्ट्रेलियन ओपनचे सहावे, तर कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
ग्रँडस्लॅम स्पर्धेची २३वी फायनल खेळणाऱ्या सेरेनाने पहिला सेट एकतर्फीच जिंकला. रशियन ब्यूटीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण ती अपयशी ठरली. शारापोवाची सुरवातच खराब झाली. तिने पहिल्याच गेममध्ये दुहेरी चूक करून आपली सर्व्हिस गमावली. सेरेना ३-२ अशी आघाडीवर असताना पाऊस आल्याने छत झाकण्यात आले. यासाठी १३ मिनिटे सामना थांबविण्यात आला.
सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर सेरेनाने आपली लय गमावली नाही. त्यानंतर शारापोवाच्या दुहेरी चुकीमुळे सेरेनाला ३ ब्रेक पॉर्इंट मिळाले. याचा तिने पुरेपूर फायदा उठविला. त्यानंतर सेरेनाने दुहेरी चूक केल्यामुळे शारापोवाला आपली सर्व्हिस तोडण्याची संधी दिली; परंतु पुढच्याच गेममध्ये सेरेनाने शारापोवाची सर्व्हिसही तोडून पहिला सेट आरामात जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये शारापोवाने थोडीफार झुंज दिली. तिने सेरेनाच्या सर्व्हिसवर आक्रमक होण्याचा प्रयत्न केला; परंतु अमेरिकन चॅम्पने तिचा प्रतिकार मोडून काढला. दोघींनीही यानंतर आपली सर्व्हिस राखल्यामुळे सेट टायब्रेकपर्यंत ताणला गेला. सेरेनाने त्यानंतर ६-५च्या स्कोअरवर ऐससोबत सामना आणि किताब आपल्या नावावर केला.(वृत्तसंस्था)
स्टेफीपाठोपाठ सेरेना
या विजयाबरोबरच सेरेना १८ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एवर्टला मागे टाकले आहे. या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, पहिल्या क्रमांकावर सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकणारी स्टेफी ग्राफ आहे.
शारापोवावरील वर्चस्व कायम
सेरेनाने शारापोवावरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सेरेनाचा हा शारापोवावरील सलग १६वा विजय आहे. ती आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सहा वेळा पोहोचली असून, या सहाही वेळा तिने अजिंक्यपद पटकावले आहे.
सेरेनाची या स्पर्धेतील गत कामगीरी
च्२००३ : सेरेना वि.वि. व्हीनस विल्यम्स ७-६ (७-४), ३-६, ६-४
च्२००५ : सेरेना वि.वि. लिंडसे डेव्हनपोर्ट २-६, ६-३, ६-०
च्२००७ : सेरेना वि.वि. मारिया शारापोवा ६-१, ६-२
च्२००९ : सेरेना वि.वि. दिनारा साफिन ६-०, ६-३
च्२०१० : सेरेना वि.वि. जस्टीन हेनिन ६-४, ३-६, ६-२
मारिया शारापोवाची स्पर्धेतील गत कामगीरी
च्२०१२ : मारिया शारापोवा प. वि. व्हिक्टोरिया अजारेंका ३-६, ०-६