सेरेनाचे लक्ष्य ‘करियर स्लॅम’
By admin | Published: August 30, 2015 10:39 PM2015-08-30T22:39:45+5:302015-08-30T22:39:45+5:30
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स सोमवार पासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस स्पर्धेत कॅलेंडर ग्रँडस्लॅम पुर्ण
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स सोमवार पासून सुरु होणाऱ्या अमेरीकन (यूएस) ओपन टेनिस स्पर्धेत कॅलेंडर ग्रँडस्लॅम पुर्ण करण्याच्या इराद्याने उतरेल. मोसमातील चौथी व शेवटची असलेली ही स्पर्धा जिंकून सेरेनाला दिग्गज टेनिसपटू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करण्याची नामी संधी देखील आहे. त्याचबरोबर स्पर्धेत मारिया शारापोवा, सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हीच, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर, ब्रिटनचा अॅण्डी मरे आणि सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेला स्पेनचा राफेल नदाल यांच्याकडे देखील सर्वांचे लक्ष असेल.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सेरेनाकडे यूएस ओपनमध्ये २७ वर्षांत पहिल्यांदा कॅलेंडर ग्रँण्डस्लॅम पुर्ण करण्याची संधी चालून आली आहे. याआधीच्या तीन ग्रँडस्लॅममध्ये बाजी मारुन सेरेनाने आपला दबदबा निर्माण केला. महिला गटामध्ये ती अग्रमानांकनासह खेळेल. त्याचवेळी पुरुष गटामध्ये सर्बियाचा नोव्हक जोकोविचला अव्वल मानांकन असून हे दोन्ही खेळाडू स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आपआपल्या गटातील सलामीचा सामना खेळतील. महिला एकेरीमध्ये सेरेनाचा सलामीचा सामना रशियाच्या वितालिया दियातचेंको विरुध्द होईल.
करियर ग्रँण्डस्लॅम करण्यात सेरेना यशस्वी ठरल्यास अशी कामगिरी करणारी ती केवळ चौथी खेळाडू ठरेल.