सानियाच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब
By admin | Published: April 14, 2015 01:00 AM2015-04-14T01:00:44+5:302015-04-14T01:00:44+5:30
भारताच्या सानिया मिर्झाच्या महिला दुहेरीतील अव्वल स्थानावर सोमवारी जाहीर झालेल्या विश्व टेनिस मानांकनामध्ये अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले.
नवी दिल्ली : भारताच्या सानिया मिर्झाच्या महिला दुहेरीतील अव्वल स्थानावर सोमवारी जाहीर झालेल्या विश्व टेनिस मानांकनामध्ये अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. सानिया व तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी रविवारी फॅमिली सर्कल कप स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपद पटकावले. या विजेतेपदासह सानियाने क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.
आज जाहीर झालेल्या क्रमवारीत सानियाच्या खात्यावर आतापर्यंत ७६६० मानांकन गुणांची नोंद आहे. सानियाने इटलीची जोडी सारा इराणी व रॉबर्टा विन्सी यांना पिछाडीवर सोडले. सारा व विन्सी यांच्या खात्यावर प्रत्येकी ७६४० मानांकन गुणांची नोंद आहे. सानिया व इटालियन खेळाडूंदरम्यान २० मानांकन गुणांचे अंतर आहे. सानियाची सहकारी हिंगीस(६४६५ मानांकन गुण) चौथ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
एआयटीए करणार सानियाचा सत्कार
हैदराबाद : अखिल भारतीय टेनिस महासंघ (एआयटीए) जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या सानिया मिर्झाचा सत्कार करणार आहे. फेड कप आशिया ओसनिया झोन ग्रुप दोन स्पर्धेदरम्यान सानियाला गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे संचालक अशोक कुमार यांनी सांगितले की,‘एआयटीएची स्पर्धेदरम्यान सानियाचा सत्कार करण्याची योजना आहे. दरम्यान, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सानियाचे
अभिनंदन केले.
सानियाकडे फेडकपचे नेतृत्व
हैदराबाद: जागतिक नंबर वनची दुहेरी खेळाडू सानिया मिर्झा उद्यापासून येथे सुरू होत असलेल्या फेडकप टेनिस स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे़ भारताची नंबर वन एकेरी खेळाडू अंकिता रैना, नताशा पल्हा आणि प्रार्थना ठोंबरे हे संघातील अन्य सदस्य आहेत़ या स्पर्धेमध्ये ११ देश एशिया, ओसोनिया ग्रुपमध्ये स्थान पटकावण्यासाठी खेळणार आहेत़ यावर्षी दोन गटात ११ देश आणि पॅसिफिक ओसोनियाचे संघ आव्हान देतील़ यामध्ये भारत, इंडोनेशिया, ओमान, पाकिस्तान, फिलिपाईन, सिंगापूर, श्रीलंका, तुर्कमेनिस्तान या देशांचा समावेश आहे़
नंबर वन होणे स्वप्नवत : सानिया
नंबर वन स्थान पटकावण्याचे स्वप्न मी नेहमीच उराशी बाळगले. गेल्या एका दशकात त्यासाठी वारंवार प्रयत्नदेखील केले. या काळात अनेक चांगले क्षणदेखील अनुभवायला मिळाले; पण नंबर वन होणे स्वप्नवत आहे, अशा शब्दात्ां स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने प्रतिक्रिया व्यक्त केली.
मार्टिना हिंगीससोबत जोडी बनविल्यापासून सानियाने गेल्या ३ स्पर्धांमध्ये एकही सामना गमावलेला नाही. अमेरिकेतील चार्ल्सटन येथील फॅमिली टेनिसचे जेतेपद पटकावताच दुहेरीत ही जोडी अव्वल स्थानावर विराजमान झाली. ही उपलब्धी मिळविणारी सानिया भारताची तिसरी खेळाडू आहे. याआधी लिएंडर पेस आणि महेश भूपती हे दुहेरीच्या अव्वल स्थानावर पोहोचले होते.
हैदराबादची निवासी असलेली सानिया चार्ल्सटन येथून दूरध्वनीवर बोलताना म्हणाली, ‘‘मी फार आनंदी आहे. सर्व कसे स्वप्नवत वाटते. मी हे स्वप्न नेहमी जोपासत आले होते. ते साकार झाल्यामुळे आनंदाला उधाण आले आहे.’’ १२ वर्षांच्या टेनिस करिअरमध्ये सानियाने अनेक सामने जिंकले. तिचा हा प्रवास चढउतारांचा ठरला. करिअरमध्ये ग्रॅण्डस्लॅम जिंकणे आणि व्यावसायिक करिअरचे हित डोळ्यांपुढे ठेवून एकेरीचे सामने सोडून देणे आदी घटनांचा उल्लेख करता येईल. अनेक चढउतार पाहिल्यानंतर विश्व क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणे कसे वाटते, असा सवाल करताच सानिया म्हणाली, ‘‘माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी याला मोठा अर्थ आहे. आम्हा सर्वांचे हे स्वप्न होते आणि त्याची पूर्तता झाली आहे. गेले पाच आठवडे आम्ही सुरेख खेळ करून हे स्थान पटकावले याबद्दल स्वत:ला धन्य मानते.’’ सानियाला या कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी पुरेसा वेळदेखील मिळणार नाही, कारण हैदराबादमध्ये दाखल होताच तिला फेडरेशन चषकात खेळायचे आहे.
मार्टिनाबद्दल सानिया म्हणाली, ‘‘ती चॅम्पियन खेळाडू आहे. संकटाच्या काळात माझ्या पाठीशी असते. आम्ही दोघींनी अव्वल स्थान गाठल्याबद्दल तीदेखील खूष आहे. आता आमचे लक्ष्य महिला दुहेरी ग्रॅण्डस्लॅम जिंकणे हे आहे. मार्टिना ही २०११मध्ये रशियाची एलिना व्हॅसेलिनासोबत फ्रेंच ओपनच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली होती; पण फायनल गमावल्याने स्वप्न भंगले. ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावणार आहोत.