सेरेना, वावरिंका, मरे उपउपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: September 5, 2016 05:46 AM2016-09-05T05:46:59+5:302016-09-05T05:46:59+5:30

सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना विक्रम नोंदविला

Serena, Wawrinka, Murray in the pre-quarterfinals round | सेरेना, वावरिंका, मरे उपउपांत्यपूर्व फेरीत

सेरेना, वावरिंका, मरे उपउपांत्यपूर्व फेरीत

Next


न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना विक्रम नोंदविला, तर पुरुष एकेरीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार अ‍ॅन्डी मरे व स्टेनिसलास वावरिंका यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
दोनदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या वावरिंकाला विजय मिळविताना घाम गाळावा लागला. दोनदा ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविणाऱ्या वावरिंकाने मॅच पॉइंटचा बचाव करताना ब्रिटनच्या डेव्ह इव्हान्सची झुंज ४-६, ६-३, ६-७, ७-६, ६-२ ने मोडून काढली. मरेला इटलीच्या पाओलो लोरेंजीचा ७-६, ५-७, ६-२, ६-३ ने पराभव करताना संघर्ष करावा लागला. मरेला पुढच्या फेरीत बुल्गारियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिमित्रोव्हने पोर्तुगालच्या जाओ सोसाचा ६-४, ६-१, ३-६, ६-२ ने पराभव केला.
वावरिंकाला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत ६३ व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या इलया मार्चेंकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मार्चेंको निक किर्गियोसविरुद्धच्या लढतीत ६-४, ४-६, १-६ ने पिछाडीवर होता. दुखापतीमुळे किर्गियोसने या लढतीतून माघार घेतल्यामुळे मार्चेंकोचा पुढच्या फेरीचा मार्ग सुकर झाला. सहावे मानांकन प्राप्त जपानच्या केई निशिकोरीने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करीत फ्रान्सच्या निकोलस माहुतचा ४-६, ६-१, ६-२, ६-२ ने पराभव केला. निशिकोरीला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी इव्हो कार्लोविचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कार्लोविचने अमेरिकेच्या जेयर्ड डोनाल्डसनचा ६-४, ७-६, ६-३ ने पराभव केला. जुआन मार्टिन डेल पोत्रोने ११ व्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररचा ७-६, ६-२, ६-३ ने पराभव केला.
महिला एकेरीत चौथ्या मानांकित अ‍ॅग्निस्का रदवांस्काने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाचा ६-२, ६-३ ने सहज पराभव केला. पाचव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने हंगेरीच्या टिमिया बाबोसची झुंज
६-१, २-६, ६-४ ने मोडून काढली तर व्हीनस विलियम्सने जर्मनीच्या लारा सिडमंडचा ६-१, ६-२ ने सहज
पराभव केला. (वृत्तसंस्था)
>सानिया, बोपन्नाची आगेकूच, पेसचे आव्हान संपुष्टात
भारताची सानिया मिर्झा व रोहन बोपन्ना यांनी आपापल्या सहकाऱ्यांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुढची फेरी गाठली, पण लिएंडर पेसचे आव्हान संपुष्टात आले. पेस व मार्टिना हिंगीस या जोडीला मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.सानिया-बारबरा या सातव्या मानांकित जोडीला पुढच्या फेरीत निकोल गिब्स व नाओ हिबिनो या बिगरमानांकित जोडीसोबत लढत द्यावी लागेल.
बोपन्ना व कॅनडाची त्याची सहकारी गॅब्रियला दाब्रोवस्की यांनी लुकास कुबोट व एंड्रिया हलावाकोव्हा यांची झुंज ५-७, ६-३, १०-७ ने मोडून काढत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. क्वार्टर फायनलमध्ये या जोडीला रॉबर्ट फराह व अ‍ॅना लेना ग्रोनफेल्ड या बिगरमानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गत चॅम्पियन पेस व हिंगीस या जोडीला कोको वांदेवेघे व राजीव राम या अमेरिकन जोडीविरुद्ध ७-६, ३-६, १३-११ ने पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत टायब्रेकमध्ये एकवेळ पेस-हिंगीस जोडी ८-४ ने आघाडीवर होती, पण तरी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
>या निकालासह सेरेनाने मार्टिना नवरातिलोव्हाचा गॅॅ्रण्डस्लॅम स्पर्धेत महिला खेळाडूने नोंदविलेला सर्वाधिक ३०७ सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. सेरेनाला नवरातिलोव्हाचा विक्रम मोडण्याव्यतिरिक्त पुरुष विभागात रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली.
>सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकची बारबरा स्ट्राइकोव्हा यांनी व्हिक्टोरिया गोलुबिच व निकोल मेलिचार यांचा ६-२, ७-६ ने पराभव करीत महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Web Title: Serena, Wawrinka, Murray in the pre-quarterfinals round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.