सेरेना विल्यम्सची चौथ्यांदा बाजी
By admin | Published: April 20, 2016 03:22 AM2016-04-20T03:22:59+5:302016-04-20T03:22:59+5:30
जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठेचा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारावर कब्जा केला
बर्लिन : जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठेचा लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारावर कब्जा केला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.
नुकताच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये जगातील विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंना २०१५मध्ये केलेल्या कामगिरीनुसार गौरविण्यात आले. जोकोविचला सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याच वेळी सेरेनाला चौथ्यांदा ‘जगातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सेरेनाने गतवर्षी जबरदस्त कामगिरी करताना ३ ग्रँडस्लॅम पटकावण्याचा पराक्रम केला होता.
व्यावसायिक फुटबॉलपटू हॉलंडचे जोहान क्रीफ यांना मरणोत्तर ‘स्पिरीट आॅफ स्पोटर््स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीफ यांचे मार्च महिन्यात निधन झाले. क्रीफ यांचे पुत्र जॉर्डी यांनी त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या दिमाखदार सोहळ्यानंतर लॉरियस अॅकॅडमीचे सदस्य आणि जोकोविचचे प्रशिक्षक माजी दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर यांनी सांगितले, ‘‘जोकोविचसाठी २०१५ वर्ष खूप चांगले ठरले. त्याने ८८ पैकी ८२ सामने जिंकताना चारपैकी तीन ग्रँडस्लॅमवर कब्जा केला. तसेच, फ्रेंच ओपनमध्येही फायनलमध्ये धडक मारली. यासह त्याने अन्य सात स्पर्धांतही बाजी मारली. खूप कमी खेळाडू अशा प्रकारचे सातत्य राखण्यात यशस्वी ठरतात.’’
या वेळी रग्बी खेळातील उल्लेखनीय कामगिरीसाठीही अनेक खेळाडूंना पुरस्कार मिळाले. यामध्ये बलाढ्य ‘आॅल ब्लॅक’ संघाला सर्वोत्तम संघ म्हणून गौरविण्यात आले. तसेच, वर्ल्डकप स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर डैन कार्टरला ‘वर्षातील सर्वोत्तम पुनरागमन’ पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. अन्य खेळांमध्ये जागतिक क्रमवारीतील द्वितीय गोल्फर अमेरिकेचा जॉर्डन स्पीथ याला ‘ब्रेक थ्रू आॅफ द इयर’ आणि आॅलिम्पिक ट्रायथलन सुवर्णविजेता जर्मनीचा जैन फ्रोडैनोला ‘अॅक्शन स्पोटर््स अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.