सेरेना विल्यम्सला विम्बल्डनचं जेतेपद, स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी
By Admin | Published: July 9, 2016 08:21 PM2016-07-09T20:21:06+5:302016-07-09T20:27:05+5:30
सेरेना विलियम्सने अँजेलिक कर्बरचा 7-5, 6-3ने पराभव करत विम्बल्डनचं जेतेपद मिळवलं आहे. या विजयासह सेरेनाने जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे
>
ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 09 - जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने विम्बल्डन महिला एकेरीचं जेतेपद मिळवलं आहे. सेरेना विल्यम्सने अंतिम फेरीत अँजेलिक कर्बरचा 7-5, 6-3ने पराभव करत विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. सेरेना विल्यम्सने सातव्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. सेरेना विल्यम्सच्या कारकिर्दीतील हे 22वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या विजयासह सेरेनाने जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
विशेष म्हणजे याआधी यावर्षाच्या सुरुवातीलाच केर्बरने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम पटकावताना सेरेनाला नमवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. सेरेनाला या पराभवाचा वचपा काढण्यात स्पर्धा जिंकली आहे.
सेरेना विल्यम्सने उपांत्य फेरीत आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर रशियाच्या एलेना वेस्नीनाचा सरळ दोन सेटमध्ये फडशा पाडला होता. एकतर्फी झालेल्या सामन्यात सेरेनाना जबरदस्त वर्चस्व राखताना केवळ ४८ मिनिटांमध्ये बाजी मारली होती. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना नियंत्रण राखलेल्या सेरेनाने सलग दोन सेटमध्ये वेस्नीनाला ६-२, ६-० असे लोळवले. पहिल्या सेटमध्ये २ गेम जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या वेस्नीनाचा दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाच्या धडाक्यापुढे काहीच निभाव लागला नाही. यावेळी सेरेनाने ताकदवर फटक्यांच्या जोरावर वेस्नीनाला एकही गेम जिंकण्याची संधी न देता दिमाखात अंतिम फेरी गाठली.