सेरेना विलियम्सची विजयी सलामी
By admin | Published: August 31, 2016 07:47 PM2016-08-31T19:47:02+5:302016-08-31T19:47:02+5:30
विम्बल्डन चॅम्पियन अॅण्डी मरे आणि महिला गटातील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्स यांनी आपआपल्या गटात सहजपणे विजयी सलामी देताना यूएस ओपन ग्रण्डस्लॅम
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 31 - विम्बल्डन चॅम्पियन अॅण्डी मरे आणि महिला गटातील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्स यांनी आपआपल्या गटात सहजपणे विजयी सलामी देताना यूएस ओपन ग्रण्डस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. दोघांनीही एकतर्फी झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकार करण्याची संधीही दिली नाही.
गेल्या काही काळापासून डाव्या खांद्याच्या दुखापतीशी झगडत असलेली सेरेना यावेळी पुर्ण तंदुरुस्त दिसली. केवळ ६३ मिनिटांमध्ये तीने सामना जिंकताना १२ एस आणि २७ विनर शॉट मारत जागतिक क्रमवारीत २९व्या स्थानी असलेल्या रशियाच्या एकाटेरिना मकारोवाला ६-३, ६-३ असे नमवले.
विशेष म्हणजे, गेल्या काही स्पर्धांपासून सेरेनाला ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यासाठी चांगलेच झुंजावे लागत आहे. त्याचवेळी दुसरीकडे दुसरे विम्बल्डन जिंकल्यानंतर ब्रिटनच्या अॅण्डी मरेने दिमाखात सलग दुस-यांदा आॅलिम्पिक गोल्ड पटकावले. त्याचप्रमाणे, ओपन युगात एकाचा कॅलेंडर वर्षात चारही ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरीत गाठणाºया चौथ्या खेळाडूचा मान मिळवण्याची संधीही मरेकडे आहे. मरेने देखील आपल्या लौकिकानुसार दणदणीत विजय मिळवताना झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलचा ६-३, ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला.
त्याचप्रमाणे, विक्रमी ७२व्यांदा मुख्य स्पर्धेत खेळणारी सेरेनाची मोठी बहीण व्हीनसने देखील दुसरी फेरी गाठली. मात्र यासाठी तीला तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. युक्रेनच्या कॅटरीना कोजलोवाचा ६-२, ५-७, ६-४ असा पाडाव करुन व्हीनसने आगेकूच केली. व्हीनसने आपल्या २२ वर्षीय प्रतिस्पर्धी विरुद्ध ६३ माफक चूका केल्या. मात्र, तरीही तीने विजयी कूच केली. त्याचवेळी व्हीनसने ४६ शानदार विनर शॉटही खेळले.
अन्य सामन्यात, पोलंडची चौथी मानांकीत एग्निएज्का रदवांस्काने सहज विजयी सलामी देताना अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ६-१, ६-१ असा फडशा पाडला. तर, पाचव्या मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेपने आक्रमक खेळाच्या जोरावर बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेंसला ६-०, ६-२ असे लोळवले.
पुरुषांमध्ये दोनवेळा उपांत्य फेरी गाठणाºया स्वित्झर्लंडचा तिसरा मानांकीत स्टेन वावरिंकाने स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कोला ७-६, ६-४, ६-४ असे नमवले. तर, २०१४ साली अंतिम फेरी गाठणारा पहिला आशियाई खेळाडू जपानच्या केई निशिकोरीनेही अपेक्षित आगेकूच करताना जर्मनीच्या बेनजामिन बेकरला ६-१, ६-१, ३-६, ६-३ असा धक्का दिला.
या स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवण्याची संधी असलेली सेरेना जर जेतेपद पटकावण्यात यशस्वी झाली, तर ओपन युगामध्ये सर्वाधिक २२ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांचा विक्रम सेरेना आपल्या नावे करेल. सध्या सेरेनाने स्टेफी ग्राफच्या २१ विजेतेपदांची बरोबरी साधली असून दिग्गज खेळाडू मार्गारेट कोर्टने सर्वाधिक २४ ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहेत.