सेरेनाला विन्सीचा धक्का
By admin | Published: September 12, 2015 04:41 AM2015-09-12T04:41:21+5:302015-09-12T04:41:21+5:30
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्सला यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पराभवाचा जबरदस्त झटका बसला. तीन सेटपर्यंतच्या थरारक रंगलेल्या लढतीत इटलीच्या
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सेरेना विलियम्सला यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पराभवाचा जबरदस्त झटका बसला. तीन सेटपर्यंतच्या थरारक रंगलेल्या लढतीत इटलीच्या रॉबर्टा विन्सीने सेरेनाला २-६, ६-४, ६-४ असा धक्का दिला.
या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी करण्याच्या सेरेनाच्या मोहिमेला ब्रेक लागला. पहिला सेट जिंकून आघाडी घेतलेल्या सेरेनाला विन्सीने यानंतर झुंजवले. दुसऱ्या सेटच्या तिसऱ्या गेमपासून झुंजार खेळ करणाऱ्या विन्सीने सेरेनाला पुर्ण कोर्टभर नाचवून थरारक बाजी मारली. विजेतेपदासाठी विन्सीसमोर इटलीच्याच फ्लेव्हिया पेनेटाचे आव्हान असेल.
तत्पूर्वी २६वी मानांकित फ्लेव्हिया पेनेटाने एकतर्फी झालेल्या सामन्यात रुमानियाच्या सिमोना हालेप हिचा अक्षरश: फडशा पाडला. सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलेल्या पेनेटाने हालेपला कोणतीही संधी न देता सरळ दोन सेटमध्ये ६-१, ६-३ असा दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेल्या पेनेटासमोर आपल्याच देशाच्या विन्सीचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)