सेरेनाचा विक्रमी विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

By admin | Published: September 6, 2016 06:58 AM2016-09-06T06:58:55+5:302016-09-06T06:58:55+5:30

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने विक्रमी 308 व्या विजयाची नोंद केली.

Serena's record win, quarter-final win | सेरेनाचा विक्रमी विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सेरेनाचा विक्रमी विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Next

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 6 - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने विक्रमी 308 व्या विजयाची नोंद केली. तिने शेडोव्हाचा 6-2 व 6-3 असा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरी गाठली. 307 सामन्यात विजय नोंदवन्याचा विक्रम रॉजर फेडररच्या नावे होता.
तत्पूर्वी सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना विक्रम नोंदविला होता, तर पुरुष एकेरीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार अ‍ॅन्डी मरे व स्टेनिसलास वावरिंका यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दोनदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या वावरिंकाला विजय मिळविताना घाम गाळावा लागला. दोनदा ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविणाऱ्या वावरिंकाने मॅच पॉइंटचा बचाव करताना ब्रिटनच्या डेव्ह इव्हान्सची झुंज ४-६, ६-३, ६-७, ७-६, ६-२ ने मोडून काढली. मरेला इटलीच्या पाओलो लोरेंजीचा ७-६, ५-७, ६-२, ६-३ ने पराभव करताना संघर्ष करावा लागला. मरेला पुढच्या फेरीत बुल्गारियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिमित्रोव्हने पोर्तुगालच्या जाओ सोसाचा ६-४, ६-१, ३-६, ६-२ ने पराभव केला. वावरिंकाला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत ६३ व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या इलया मार्चेंकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
मार्चेंको निक किर्गियोसविरुद्धच्या लढतीत ६-४, ४-६, १-६ ने पिछाडीवर होता. दुखापतीमुळे किर्गियोसने या लढतीतून माघार घेतल्यामुळे मार्चेंकोचा पुढच्या फेरीचा मार्ग सुकर झाला. सहावे मानांकन प्राप्त जपानच्या केई निशिकोरीने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करीत फ्रान्सच्या निकोलस माहुतचा ४-६, ६-१, ६-२, ६-२ ने पराभव केला. निशिकोरीला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी इव्हो कार्लोविचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कार्लोविचने अमेरिकेच्या जेयर्ड डोनाल्डसनचा ६-४, ७-६, ६-३ ने पराभव केला. जुआन मार्टिन डेल पोत्रोने ११ व्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररचा ७-६, ६-२, ६-३ ने पराभव केला. महिला एकेरीत चौथ्या मानांकित अ‍ॅग्निस्का रदवांस्काने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाचा ६-२, ६-३ ने सहज पराभव केला. पाचव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने हंगेरीच्या टिमिया बाबोसची झुंज ६-१, २-६, ६-४ ने मोडून काढली तर व्हीनस विलियम्सने जर्मनीच्या लारा सिडमंडचा ६-१, ६-२ ने सहज पराभव केला.

Web Title: Serena's record win, quarter-final win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.