सेरेनाचे विक्रमी ग्रँडस्लॅम एक पाऊल दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 03:42 AM2019-09-07T03:42:30+5:302019-09-07T03:42:39+5:30
यूएस ओपन : कॅनडाच्या बियांका आंद्रिस्कूविरुद्ध भिडणार
न्यूयॉर्क : विक्रमी २३ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकविणारी अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्स हिने यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. पाचवी मानांकित युक्रेनची एलिना स्वितोलिना हिला सेरेनाने ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले. कारकीदीर्तील २४ वे ग्रँडस्लॅम जिंकून दिग्गज मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचे सेरेनाचे लक्ष्य आहे.
सेरेनापुढे अंतिम फेरीत १५ वी मानांकित कॅनडाची बियांका आंद्रिस्कू हिचे आव्हान असेल. दुसऱ्या उपांत्य लढतीत स्वित्झर्लंडची १३ वी मानांकित बेलिंडा बेंकिक हिला बियांकाने ७-६ (७-३), ७-५ असे पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आधीच्या सामन्यात स्वितोलिनाने ज्या पद्धतीचा खेळ केला होता, त्यामुळे सेरेनाला ती जोरदार टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण सेरेनाने तिला सामन्यात डोके वर काढू दिले नाही. पहिला सेट जिंकताना स्वितोलिनाने थोडीशी झुंज दिली. तरीही सेरेनाने सेट ६-३ असा जिंकला. दुसºया सेटमध्ये तर स्वितोलिनाने शस्त्र खाली टाकल्याचा भास झाला. त्यामुळे सरळ दोन सेटमध्ये सेरेनाने सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या विजयासह सेरेनाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
युजिनी बूचार्डनंतर (२०१४) १९ वर्षांची आंद्रिस्कू ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी कॅनडाची दुसरी टेनिसपटू ठरली. आंद्रिस्कूने यूएस ओपनचे जेतेपद पटकविल्यास मारिया शारापोवापाठोपाठ ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविणारी ती दुसरी सर्वांत युवा खेळाडू बनेल. मात्र यासाठी तिला दिग्गज सेरेना विलियम्सचे तगडे आव्हान परतवावे लागेल. मारियाने २००६ ला अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकविले होते.
पहिल्यांदा अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळणाºया आंद्रिस्कूने पहिला सेट पॉर्इंट गमविल्यानंतर सामना जिंकला हे विशेष. (वृत्तसंस्था)