भारत व न्यूझीलंड हॉकी संघांदरम्यान सहा कसोटी सामन्यांची मालिका
By admin | Published: September 22, 2015 11:56 PM2015-09-22T23:56:47+5:302015-09-22T23:56:47+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडविरुद्ध २ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत आॅकलंड, नेल्सन आणि ख्राईस्टचर्चमध्ये सहा कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडविरुद्ध २ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत आॅकलंड, नेल्सन आणि ख्राईस्टचर्चमध्ये सहा कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हॉकी इंडियाने स्पष्ट केले की, ‘‘भारतीय संघ न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध पहिले दोन सामने खेळणार असून, त्यानंतर चार सामने न्यूझीलंड सिनिअर पुरुष संघाविरुद्ध खेळणार आहे.’’
भारतासाठी हा दौरा डिसेंबर महिन्यात रायपूरमध्ये होणाऱ्या एफआयएच विश्व हॉकी लीग फायनलच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता न्यूझीलंड आगामी ओशियाना कप स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर त्यांना २०१६च्या रिओ आॅलिम्पिकसाठी स्थान निश्चित करण्याची संधी आहे. आॅगस्ट महिन्यात भारतीय संघाने युरोप दौऱ्यात फ्रान्स व स्पेनचा पराभव केला होता.
जून २०१५मध्ये न्यूझीलंडला एफआयएच विश्व लीग सेमीफायनलमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांच्याकडे आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्यांना ओशियाना कप
२०१५ या स्पर्धेत जेतेपद पटकवावे लागेल.
हॉकी इंडियाचे सचिव मोहंमद मुश्ताक अहमद यांनी या दौऱ्याबाबत सांगितले की, ‘‘आगामी स्पर्धांचा विचार करता ही मालिका महत्त्वाची आहे. यामुळे आम्हाला प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाच्या बदललेल्या शैलीची कल्पना येईल.’’
न्यूझीलंड हॉकीचे मुख्य कार्यकारी माल्कम हॅरिस म्हणाले, ‘‘आम्ही या मालिकेबाबत उत्सुक आहोत. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघ प्रथमच न्यूझीलंड दौऱ्यावर येत आहे. आम्ही चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहोत.’’ (वृत्तसंस्था)