मालिका आयोजनासाठी भारताच्या मागे धावणार नाही : पीसीबी
By admin | Published: September 23, 2015 11:05 PM2015-09-23T23:05:33+5:302015-09-23T23:05:33+5:30
आगामी डिसेंबर महिन्यात यूएईत द्विपक्षीय मालिका आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे वारंवार आग्रह धरला
कराची : आगामी डिसेंबर महिन्यात यूएईत द्विपक्षीय मालिका आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे वारंवार आग्रह धरला; पण यापुढे पीसीबी मुळीच आग्रह करणार नाही. चेंडू भारताच्या कोर्टात आहे. प्रस्तावित मालिकेचे भविष्य बीसीसीआयनेच ठरवावे, असे मत पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी बुधवारी नोंदविले.
पत्रकारांशी बोलताना शहरयार म्हणाले, ‘माझ्या मते मालिका आयोजनासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. आता पुन्हा आग्रह करणार नाही. मालिकेचे भविष्य भारतानेच निश्चित करावे.’ आगामी मालिका आणि भारतासोबतचे संबंध याबाबत ते पुढे म्हणाले, ‘पीसीबीने मालिका खेळण्यासंदर्भात व द्विपक्षीय संबंध सुधारण्यास नेहमीच सकारात्मक वाव दिला. आम्ही याबाबत जे पत्र बीसीसीआयला दिले ते अद्याप त्यांच्या सरकारकडे पोहोचले नाही, हाचिंतेचा विषय ठरतो. भारताने मालिकेतून माघार घेतल्यास आम्ही आयसीसीशी संपर्क करू, तसेच अन्य बोर्डाच्या संपर्कात राहू. ही मालिका दोन्ही बोर्डांदरम्यानच्या परस्पर समझोत्याचा भाग आहे. दोन्ही बोर्डाच्या समझोत्यावर स्वाक्षऱ्या आहेत. गरज भासल्यास हा मुद्दा उपस्थित केला जाईल. क्रिकेट आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी असल्याचे पाकचे स्पष्ट मत आहे.’
उभय देशांतील संबंध याआधीही तणावाचे राहिले, पण आम्ही क्रिकेट खेळत आलो असे नमूद करीत शहरयार पुढे म्हणाले, ‘भारतीय संघ आमच्याविरुद्ध २००७ मध्ये मात्र कसोटी
मालिका खेळला नाही. आता आम्ही भारताच्या मागे धावणार नाही. भारताला आता निर्णय घ्यावा लागेल. द्विपक्षीय मालिका आयोजनाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. पाकने प्लान ‘ब’संदर्भात काम सुरू केले असून अद्याप त्यात यश आलेले नाही; कारण डिसेंबरमध्ये केवळ दोन संघ रिकामे आहेत. त्यापैकी एक संघ झिम्बाब्वे आहे. या संघासोबत आम्ही यंदा दोनदा मालिका खेळली. दुसरा संघ बांगला देश आहे. बांगला देश प्रीमियर लीगमध्ये व्यस्त असला तरी पर्याय खुले आहेत.’
पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेदेखील भारतासोबत खेळणे ही केवळ पाकची गरज समजू नये. भारतालादेखील याची अधिक गरज असल्याचे वक्तव्य केले होते. शोएब म्हणाला,‘पाकला या मालिकेची गरज आहे असे मानू नये. भारतालादेखील आमच्या संघाविरुद्ध खेळायची इच्छा आहे. भारत-पाक मालिकेमुळे उभय बोर्डांना मोठा आर्थिक लाभ होईल. या लाभामुळे क्रिकेटच्या पायाभूत सुविधांकडे अधिक लक्ष देता येईल. भारत आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याची आम्हाला जाणीव आहे; पण पाकविरुद्ध खेळून बीसीसीआय आणखी जास्त कमाई करू शकते.’