मालिका विजयाचे वेध
By admin | Published: August 28, 2015 03:39 AM2015-08-28T03:39:52+5:302015-08-28T03:39:52+5:30
श्रीलंकेविरुद्ध तिसरी आणि अखेरची कसोटी उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार असून २२ वर्षांत पहिल्यांदा
कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध तिसरी आणि अखेरची कसोटी उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार असून २२ वर्षांत पहिल्यांदा ही संधी चालून आली आहे.
पी. सारा ओव्हलवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार या नात्याने कसोटी जिंकण्यात विराट कोहलीला पहिले यश मिळाले. कुमार संगकाराचा निरोपाचा हा सामना भारताने २७८ धावांनी जिंकला. भारताने लंकेत याआधी १९९३ साली कसोटी मालिका जिंकली होती. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने ती मालिका १-० ने खिशात घातली होती.
पाच गोलंदाजांसह खेळण्याचे कोहलीचे डावपेच अलगद कामी आले. गाले येथे तीन फिरकी गोलंदाजांना आणि कोलंबोत हरभजनला विश्रांती देत स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली होती. हे गोलंदाज लंकेचे ४० गडी बाद करण्यात यशस्वी ठरले आहेत. आश्विनने आतापर्यंत १७ बळी घेतले. दोन्ही सामन्यांत जो नऊ दिवस खेळ झाला, त्यात आठ दिवस भारतीय संघाने वर्चस्व गाजविले. अमित मिश्राने १२ गडी बाद केले. वेगवान माऱ्यात ईशांत शर्मा आणि उमेश यादव हे देखील मागे नव्हते.
भारताने फलंदाजी क्रमातही बदल केला. अजिंक्य रहाणे तिसऱ्या स्थानावर खेळायला आला, तर रोहित शर्माला पाचव्या स्थानावर खेळविण्यात आले. पाच गोलंदाजांचा प्रयोग झाल्याने चेतेश्वर पुजारा याला मधल्या फळीतही स्कोप नव्हता. मुरली विजय
आणि शिखर धवन हे जखमी झाल्याने तिसऱ्या
सामन्यात पुजारा-लोकेश राहुल सलामीला येतील. यामुळे नमन ओझा यालादेखील कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. करुण नायर याला मात्र बाहेर बसावे लागेल.
दुसरीकडे कुमार संगकाराला विजयी निरोप देण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेल्याने लंका संघ निराश आहे. शिवाय संगकाराची उणीव भरून काढणारा फलंदाज शोधण्याची संघाला चिंता आहे. संगकाराऐवजी तिसऱ्या स्थानावर उपुल थरंगा याला बढती मिळेल. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज चौथ्या आणि लाहिरू थिरीमाने पाचव्या स्थानावर खेळायला येतील. रंगना हेरथला पूरक ठरणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असल्याने चौथ्या दिवसापासून त्या फिरकीला योग्य ठरण्याची शक्यता असून, खेळपट्टी पाटा ठरते की अन्य खेळपट्ट्यांसारखी ही खेळपट्टीदेखील गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरेल याबद्दल पुढील पाच दिवसांत कळणार आहे. (वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, नमन ओझा, करुण नायर, रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण अॅरोन, स्टुअर्ट बिन्नी.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कौशल सिल्व्हा, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चांदीमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कौशल परेरा, रंगना हेराथ, दिलरुवान परेरा, थारिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामीरा.
हेड टू हेड
भारत व श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत ३७ कसोटी सामने झाले़ यात भारताने १५ सामने जिंकले असून ७ सामने त्यांना पराभव पत्करावा लागला़ १५ सामने अनिर्णित राहिले़
विराट कोहली आणि कंपनी तिसरी कसोटी जिंकण्याच्या तयारीत मैदानात उतरेल़ श्रीलंकेमध्ये २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा त्यांचा इरादा राहील़
भारताने लंकेत याआधी १९९३ साली कसोटी मालिका जिंकली होती. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने ती मालिका १-० ने खिशात घातली होती.
तीन फिरकी गोलंदाजांना आणि कोलंबोत हरभजनला गाले येथे
विश्रांती देत स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली होती. हे गोलंदाज
लंकेचे ४० गडी बाद करण्यात यशस्वी ठरले असून आश्विनचे आतापर्यंत १७ बळी झाले आहेत़
संगकाराच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी भरण्यास वेळ लागेल; पण भारताविरुद्धच्या निर्णायक सामन्यात उपुल तरंगा ही उणीव दूर करण्यास सज्ज आहे. आमचा फलंदाजी क्रम अद्याप स्थिर नाही. चांगला क्रम तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसरा सामना यजमानांसाठी कठीण आहे. विकेटवर काही प्रमाणात गवत असल्याने आम्ही सकारात्मक खेळणार आहोत.
- अँजेलो मॅथ्यूज, कर्णधार श्रीलंका
आमच्या गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत दोन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली. निर्णायक कसोटीतही या कामगिरीची पुनरावृत्ती होईल. फलंदाजी क्रम परिस्थितीनुसार बदलू. प्रत्येक फलंदाजासाठी संघात कुठली पोझिशन निश्चित आहे, हे पडताळून पाहू. विजयासाठी कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही. त्याच वेळी आत्मसंतुष्टदेखील राहणार नाही.
-रवी शास्त्री, संचालक टीम इंडिया