गंभीर, वॉर्नरकडे लक्ष
By admin | Published: May 17, 2017 07:15 PM2017-05-17T19:15:45+5:302017-05-17T19:15:45+5:30
इलिमनेटर सामना आज थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सुरू होणार आहे
आॅनलाईन लोकमत
बंगळुरु, दि. 17 - इलिमनेटर सामना आज थोड्याच वेळात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सुरू होणार आहे. या सामन्यात गंभीरचे आक्रमक रुप पाहण्यास केकेआरचे फॅन्स
उत्सुक असतील. हैदराबादच्या चाहत्यांना प्रतिक्षा असेल ती दुखापग्रस्त युवराज सिंहच्या पुनरागमनाची आणि सोबतच हैदराबादचा कर्णधार आपल्या संघाला विजयपथावर कसा नेतो याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल. आयपीएलच्या या सत्रातील या हायव्होल्टेज सामन्या केकेआरला पुनरागमनाची प्रतिक्षा आहे. सत्राच्या सुरूवातीला आक्रमक आणि वेगवान वाटणारा हा संघ अखेरच्या काही सामन्यात पराभवाला सामोरे गेलेला आहे. त्यात गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांचे अपयश नक्कीच संघासाठी चिंतेचा विषय असेल.
सलामीवीर सुनिल नरेन आणि ख्रीस लीन यांच्या दमदार सलामीनंतरही केकेआर अनेकदा मोठी धावसंख्या उभारण्यात किंवा धावांचा पाठलाग करण्यात कमी पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड होण्याआधी तडफेने खेळणारा
गंभीर नंतर काहीसा शांत वाटला. त्याचे मैदानावरचे आक्रमक रुप देखील काहीसे वेगळेच भासले. हैदराबादविरुद्ध पहिला सामना जिंकणाऱ्या केकेआरला दुसऱ्या सामन्यात हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. विजय शंकर या नवोदित खेळाडूने
केकेआरच्या गोलंदाजीची पिसे काढली. केकेआरच्या गोलंदाजांना वॉर्नर आणि धवनपासून सावध रहावे लागेल. त्यासोबतच मोझेस हेन्रीक्सही आहेच. युवराज सिंहचा फिट असला तर तो कोलकात्याच्या गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरु शकतो.
या आधीही त्याने या सत्रात मोठी खेळी केली आहे. केकेआरच्या गोलंदाजीची मदार ही प्रामुख्याने फिरकीवर अवलंबून असेल.
चायनामन कुलदीप यादव, पियुष चावला, सुनिल नरेन हे फिरकीचे प्रमुख अस्त्र आहे. तर कुल्टर नाईल, डी ग्र्राण्ड होम, उमेश यादव, ट्रेंट बोल्ड हे जलदगती गोलंदाजही केकेआरच्या दिमतीला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात केकेआरचे संघ व्यवस्थापन आणि गंभीर कुणाला साथ देतात हे पाहणे रंजक ठरेल.
हैदराबादची गोलंदाजी ही आयपीएलमधील सर्वात प्रभावी गोलंदाजी समजली जाते. भुवनेश्वर कुमारकडे पर्पल कॅप आहे. अफगाणचा युवा फिरकीपटू राशिद खान याने आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. तर मोहम्मद सिराज याने गेल्या
सामन्यात गुजरात लायन्सविरोधात केलेल्या भेदक माऱ्याकडे गंभीर नक्कीच दुर्लक्ष करणार नाही. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्स विरोधात लढेल. मंगळवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुण्याकडून पराभव पत्करावा
लागला आहे. त्यामुळे आता अखेरची फेरी गाठण्यासाठी मुंबईला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळावे लागेल. त्यांच्याविरोधात केकेआर विरुद्ध हैदराबाद यांच्यातील विजेता संघ लढेल.