तोडगा निघेल : ठाकूर
By admin | Published: March 4, 2016 02:51 AM2016-03-04T02:51:07+5:302016-03-04T02:51:07+5:30
धरमशाला येथे भारत-पाक सामन्याच्या आयोजनाबद्दल सुरक्षेचा कुठलाही मुद्दा नाही. विश्वचषक टी-२० चा हा सामना पूर्वनियोजित तारखेला येथेच आयोजित होईल, असा पुनरुच्चार
नवी दिल्ली : धरमशाला येथे भारत-पाक सामन्याच्या आयोजनाबद्दल सुरक्षेचा कुठलाही मुद्दा नाही. विश्वचषक टी-२० चा हा सामना पूर्वनियोजित तारखेला येथेच आयोजित होईल, असा पुनरुच्चार ‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी केला.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले खा. ठाकूर यांनी सांगितले की, ‘माझी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्यासोबत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी मला सामन्याला विरोध दर्शविणाऱ्यांची समजूत काढण्याचे आश्वासन दिले आहे. हा सामना विश्वचषकाचा आहे, द्विपक्षीय मालिकेतील सामना नव्हे हे मी स्पष्ट करू इच्छितो. आम्ही धरमशाला येथे द्विपक्षीय मालिकेतील सामना करू शकत नसू; पण हा विश्वचषकाचा सामना आहे. विश्वचषकाचे वेळापत्रक वर्षभरापूर्वी ठरते. एका रात्रीतून त्यात बदल होणे शक्य नाही. चर्चेद्वारे तोडगा काढण्यावर आमचा विश्वास आहे. कारगील युद्धानंतरही २००५ साली पाकने धरमशाला येथे सामना खेळला होता. विश्वचषकाचा सामना देशाच्या सन्मानाचा सवाल असल्याने आम्ही हा सामना निर्विघ्न पार पाडू
इच्छितो.’
या सामन्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयने संमती दिल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ‘मुख्यमंत्री विरोध दर्शविणाऱ्यांचे मत परिवर्तन करण्यात यशस्वी होतील अशी आशा आहे. धरमशाला येथे सामना पाहू इच्छिणाऱ्यांनी आधीपासून हॉटेल बुक केले आहेत. तिकिटे बुक केली व अन्य सोयीदेखील बुक केल्या आहेत. ऐनवेळी सामना हलविण्याचा प्रश्नच नाही. मीडियात आलेल्या वृत्तानुसार आम्ही कुठलेही पर्यायी स्थळ शोधलेले नाही.’
पठाणकोट हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतोच; शिवाय शहिदांच्या हौतात्म्याचा आम्हालाही सन्मान आहे, असे सांगून ठाकूर म्हणाले, ‘नुकताच आसाममध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ५०० पाकिस्तानी खेळाडू खेळले. त्यावेळी विरोध झाला नाही. हा विश्वचषकाचा सामना आहे. याला विरोध होऊ नये.’ (वृत्तसंस्था)इस्लामाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताकडून पाकिस्तान संघाला सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच आमचा संघ सहभागी होईल, असे पाकचे गृहमंत्री निसार अली खान यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘सुरक्षेची संपूर्ण हमी मिळाल्यानंतरच आम्ही संघाला भारतात जाण्यास परवानगी देऊ. सुरक्षेची हमी ही भारताचीच नव्हे तर आयसीसीची जबाबदारी आहे.’ धर्मशाला येथे १९ मार्चला भारत-पाक सामन्याच्या आयोजनावरून खडाजंगी सुरू असतानाच पाक गृहमंत्र्यांनी वक्तव्य केले. हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरविण्यास नकार दिला आहे. गृहमंत्री खान यांनी पाक संघाच्या भारत दौऱ्याविषयी पीसीबी प्रमुखांशी चर्चेनंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांना मी अहवाल देणार असल्याचे म्हटले आहे.सुरक्षा दलाची गरज नाही
या सामन्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्याची शक्यता ठाकूर यांनी फेटाळून लावली. भारत हा सुरक्षित देश असल्याने येथे सुरक्षेची समस्या नाही. पाकला सुरक्षेची भीती बाळगण्याची गरज नाही. हा राज्य सरकार आणि बीसीसीआयच्या चिंतेचा विषय आहे, असे ते म्हणाले.