७ लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू, ८० हून अधिक जखमी; स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:38 AM2023-08-26T11:38:31+5:302023-08-26T11:38:58+5:30
इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १३ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये ७ लहान मुलांचा समावेश होता
मादागास्करमध्ये शुक्रवारी इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १३ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये ७ लहान मुलांचा समावेश होता. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, देशाचे पंतप्रधान ख्रिश्चन नॅचेझ यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. चेंगराचेंगरीत सुमारे ८० जण जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
मादागास्करची राजधानी अँटानानारिव्हो येथील महामासिना स्टेडियममध्ये आयोजित उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आलेले देशाचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि स्टेडियममध्ये उपस्थित लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये रेड क्रॉसचे कर्मचारी अॅथलेटिक्स ट्रॅकच्या बाजूला डझनभर जखमी लोकांना मदत करताना दिसत आहेत.
सुमारे ४१००० लोकांची क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. याआधी २०१९मध्ये एका कॉन्सर्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये मादागास्कर आणि सेनेगल यांच्यातील आफ्रिकन कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता खेळापूर्वी चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि ३७ जण जखमी झाले होते.
इंडियन ओशन आयलँड गेम्समध्ये विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये या प्रदेशातील अनेक देश भाग घेतात. कोमोरोस, मालदीव, माउतिर्टियस, मेयोट, रियुनियन आणि सेशेल्सचे खेळाडूही या खेळांमध्ये भाग घेतात. हे खेळ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) १९७७मध्ये तयार केले होते. मेडागास्कर येथे ३ सप्टेंबरपासून या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.