अदिती हेगडेला राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सात पदके
By संदीप भालेराव | Published: August 21, 2023 03:10 PM2023-08-21T15:10:33+5:302023-08-21T15:10:43+5:30
अदितीला सेवानिवृत्त साई प्रशिक्षक शंकर मादगुंडी आणि विकास भडांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
नाशिक : भुवनेश्वर(ओडिसा) येथे सुरू असलेल्या ३९व्या सब ज्युनिअर आणि ४९व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नाशिकच्या अदिती हेगडे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण सात पदक पटकाविली. तिच्या या कामगिरीमुळे एशियन वयोगट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अदितीला सेवानिवृत्त साई प्रशिक्षक शंकर मादगुंडी आणि विकास भडांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या अदितीने ४०० बाय २०० मीटर फ्री स्टाईल रिलेत कांस्य, ४ बाय १०० मीटर मोडले रिलेमध्ये रौप्य, १५०० मीटर फ्री स्टाइलमध्ये आणि १०० मीटर बटर फ्लायमध्ये कांस्य, तर ४०० मीटर फ्री स्टाइलमध्ये सुवर्ण आणि २०० मीटर फ्री स्टाइलमध्ये कांस्य अशी सात पदके मिळविली. जलतरण तलावाच्या व्यवस्थापक माया जगताप, मनपाचे अधिकारी तसेच स्वीमिंग फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी तिचे कौतुक केले.