वानखेडेवर शाहरुखचा राडा
By admin | Published: April 8, 2015 03:44 PM2015-04-08T15:44:38+5:302015-04-08T15:44:38+5:30
२०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने स्पर्धेचे जेतेपद पटकावले असले तरी संघाचा मालक शाहरुख खानच्या मुजोरपणामुळे वानखेडेवर वाद निर्माण झाला.
Next
>आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ विकत घेत शाहरुख खानने क्रीडा क्षेत्रात पदार्पण केले. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने निराशाजनक कामगिरी केल्याने शाहरुखचे क्रीडा क्षेत्रातील पदार्पण अपयशी ठरल्याची चर्चा होती. मात्र २०१२ च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयाच्या नादात शाहरुखचा तोल गेला व त्याने वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षा रक्षक व एमसीएच्या पदाधिका-यांशी हुज्जत घालून नवा वाद निर्माण केला.
आयपीएल २०१२ मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात फायनल रंगली. यात कोलकाताने चेन्नईवर मात करत स्पर्धेचे जेतेपद गाठले. मात्र या विजयाचे सेलिब्रेशन सुरु असताना कोलकात्याचा मालक शाहरुखने मुजोरी दाखवली. शाहरुखने मैदानातील सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली व एमसीएच्या पदाधिका-यांना शिवीगाळही केली. या प्रकरणाच एमसीएने दखल घेतली व शाहरुखला वानखेडेवर पाच वर्षांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली. आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्टेडियममधील धुम्रपान केल्याप्रकरणीही शाहरुख वादाच्या भोव-यात अडकला होता.