शाहिद आफ्रिदीने कर्णधारपद सोडले
By admin | Published: April 3, 2016 09:30 PM2016-04-03T21:30:40+5:302016-04-03T21:30:40+5:30
आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या शाहीद आफ्रिदीने आज कर्णधारपदाचा राजीनामा दिला, पण टी-२० क्रिकेटमध्ये तो खेळणे सुरू ठेवणार आहे.
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ३ - आयसीसी विश्व टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या शाहीद आफ्रिदीने आज, रविवारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला, पण टी-२० क्रिकेटमध्ये तो खेळणे सुरू ठेवणार आहे.
आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला भारताच्या यजमानपदाखाली आयोजित टी-२० विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. स्पर्धेदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळेही त्याला टीकेला सामोरे जावे लागले.
कर्णधार म्हणून विश्व टी-२० स्पर्धा अखेरची स्पर्धा ठरू शकते, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि ३६ वर्षीय अष्टपैलू आफ्रिदीने संकेत दिले होते.
आफ्रिदीने टिष्ट्वट केले की,‘पाकिस्तान आणि जगभरातील चाहत्यांना सूचित करीत आहे की, आज, रविवारी मी माझ्या इच्छेने पाकिस्तान टी-२० संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मातृभूमीला सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कर्णधारपदाचे कर्तव्य बजावण्यात यशस्वी ठरल्यामुळे मी अल्लाचा आभारी आहे.’
आफ्रिदीने पुढे म्हटले की, ‘खेळाडू म्हणून संघासाठी भविष्यातही उपलब्ध राहीन.’ पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मात्र या अष्टपैलू खेळाडूचे संघातील स्थान पक्के नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान आफ्रिदी वादामध्ये अडकला होता. सुरुवातीला त्याने खेळाडूंना पाकच्या तुलनेत भारतात अधिक प्रेम मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे आफ्रिदी पाकमध्ये टीकेचे लक्ष्य ठरला होता. त्यानंतर पाकिस्तानने साखळी फेरीत तीन सामने गमावले. त्यात भारताविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाचाही समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याने मोहालीमध्ये संघाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार व्यक्त करताना काश्मिरी लोकांचा प्रामुख्याने उल्लेख केला. त्यामुळे वाद निर्माण झाला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याआफ्रिदीवर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टीका केली होती.
>> आफ्रिदी म्हणाला, ‘मी पीसीबी व पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्याप्रति आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे मला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मी देशातर्फे लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणे सुरू ठेवण्यास इच्छुक आहे. पाकिस्तान संघासाठी एक खेळाडू म्हणून जगभरात माझी कामगिरी उल्लेखनीय ठरावी, यासाठी अल्लाला साकडे घालावे, अशी मी चाहत्यांना विनंती करतो.’
आफ्रिदीने कारकिर्दीत पाकिस्तानतर्फे २७ कसोटी सामन्यात १७१६ धावा फटकावल्या असून, ४८ बळी घेतले आहेत. त्याने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आफ्रिदीने ३९८ वन-डे आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ८०६४ धावा फटकावल्या आणि ३९५ बळी घेतले. त्याने आतापर्यंत ९८ टी-२० आंतरारष्ट्रीय खेळले असून १४०५ धावा फटकावल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने टी-२० मध्ये ९७ बळी घेतले आहेत.