शैली सिंग लांब उडीच्या अंतिम फेरीत दाखल, २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:04 AM2021-08-21T09:04:21+5:302021-08-21T09:04:39+5:30
Shaili Singh : १७ वर्षीय शैलीला भारताची भविष्यातील स्टार मानले जात आहे. तिने महिलांच्या लांबउडी ब गटात आपल्या तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात सर्वोत्तम प्रदर्शन केले. दुसऱ्या प्रयत्नात शैलीने ५.९८ मीटरची उडी घेतली होती.
नैरोबी : भारताची लांब उडीतील उदयोन्मुख खेळाडू शैली सिंग हिने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीत अव्वल राहिलेल्या शैलीने ६.४० मीटरची उडी घेत सर्वांनाच प्रभावित केले.
१७ वर्षीय शैलीला भारताची भविष्यातील स्टार मानले जात आहे. तिने महिलांच्या लांबउडी ब गटात आपल्या तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात सर्वोत्तम प्रदर्शन केले. दुसऱ्या प्रयत्नात शैलीने ५.९८ मीटरची उडी घेतली होती.
या कामगिरीनंतर शैलीला सुवर्ण पदकाची संभाव्य विजेती मानले जात असले, तरी अंतिम फेरी मात्र अत्यंत अटीतटीची रंगेल. कारण यामध्ये आधीच जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी प्रवेश केलेला आहे. ६ त्यामुळे पदकासाठी शैलीला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
स्वीडनच्या १८ वर्षीय माजा असकागने अ गटात अव्वल राहताना ६.३९ मीटरची उडी घेतली. एकूण क्रमवारीत ती दुसऱ्या स्थानी राहिली. याशिवाय, ब्राझीलची लिसांद्रा कम्पोस (६.३६ मीटर), जमैकाची शांते फोरमॅन (६.२७ मीटर) आणि युक्रेनची मारिया होरिलोवा (६.२४ मीटर) यांनीही अंतिम फेरी गाठली असून, यांच्याकडून शैलीला कडवी टक्कर मिळेल.
कोण आहे शैली?
झाशीमध्ये जन्मलेल्या शैलीला तिच्या आईने मोठे केले. कपडे शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या शैलीच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शैलीला लहानाचे मोठे केले. बंगळुरू येथील भारताची दिग्गज लांब उडीपटू अंजू
बॉबी जॉर्ज हिच्या अकादमीत शैली प्रशिक्षण घेते. अंजूचे पती बॉबी जॉर्ज हे शैलीचे प्रशिक्षक असून, शैलीने जूनमध्ये ६.४८ मीटरची उडी घेत राष्ट्रीय वरिष्ठ आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती.