World Athletics U20 Championships: शैली सिंहला जागतिक स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक; केवळ १ सेंटिमीटरने सुवर्ण हुकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:11 PM2021-08-22T21:11:57+5:302021-08-22T21:13:33+5:30
World Athletics U20 Championships: २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शैली सिंहने लांब उडीत रौप्यपदक पटकावले आहे.
नैरोबी: नैरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शैली सिंहने लांब उडीत रौप्यपदक पटकावले आहे. केवळ एका सेंटिमीटरच्या फरकामुळे शैली सिंहचे सुवर्णपदक हुकले आहे. (shaili singh wins silver medal in long jump in world athletics u20 championships)
नौरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. लांब उडीत शैली सिंहने ६.५९ मी उडी मारत रौप्य पदक जिंकले. तर, स्वीडनच्या माजा स्काग हिने ६.६०मी उडी मारत सुवर्ण पदावर आपले नाव कोरले. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने सायली सिंहचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. शैली सिंह भारताची दिग्गज अॅथलेटिक अंजू बेबी जॉर्जच्या बेंगळुरू येथील अकादमीत सराव करते. या स्पर्धेत एक वेळ अशी होती जेव्हा शैली सुवर्णपदकाच्या शर्यतीत सर्वांत पुढे होती. पण ज्युनियर युरोपियन चॅम्पियन असलेल्या माजाने चौथ्या प्रयत्नात ६.६० इतकी लांब उडी मारत सुवर्णपदक पटकावले.
The leap that won Shaili Singh the silver. India's 7th medal ever at the World Athletics U20 C'ship.
— Nikhil Naz (@NikhilNaz) August 22, 2021
Missed the Gold by just 1cm. pic.twitter.com/WLgP2Tc6xC
यापूर्वी, भारतीय अॅथलीट अमित खत्रीने शनिवारी १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. अमितने ४२ मिनिट १७.९४ सेकंदांसह ही शर्यत पूर्ण केली. तर केनियाच्या हेरिस्टोन व्हॅनीयोनीने ४२ मिनिट १७.८४ वेळेसह सुवर्णपदक पटकावले. स्पेनच्या पॉल मॅक्ग्राने ४२ मिनिट २६.११ सेकंद वेळेसह कांस्य पदक जिंकले. भारताने एकाच चॅम्पियनशिपमध्ये फूट रेसमध्ये दोन पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. अभिनंदन चॅम्पियन, असे ट्विट साईने केले होते. तसेच ४x४०० मीटर मिश्र रिलेमध्ये भारताने कांस्य पदकाची कमाई केली होती. भरत, कपिल, सुम्मी आणि प्रिया मोहन यांनी ३ मिनिट २०.६० सेकंद वेळ नोंदवत कांस्य पटकावले होते.