लाजीरवाणं; कर्तुत्वापेक्षा हिमाची जात शोधण्यात भारतीयांना रस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 09:44 AM2018-07-17T09:44:20+5:302018-07-17T11:18:49+5:30
हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. मात्र, भारतीयांना या सुवर्ण कामगिरीपेक्षा तिची ' जात ' जाणून घेण्यास अधिक रस असल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. गुगलवर 'hima das caste' हा विषय सर्वाधिक चर्चिला गेला.
मुंबई - हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. तिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ही विक्रमी कामगिरी केली. शेतक-याच्या मुलीने घेतलेल्या या फिनिक्स भरारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा व अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी कौतुक केले. मात्र, भारतीयांना या सुवर्ण कामगिरीपेक्षा तिची ' जात ' जाणून घेण्यास अधिक रस असल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. गुगलवर 'hima das caste' हा विषय सर्वाधिक चर्चिला गेला. ( लाल रेषा - हिमाच्या सुवर्णपदकाबद्दल जाणून घेणार-यांचे प्रतिक, निळी रेषा - हिमाची जात जाणणा-यांचे प्रतिक )
आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर हिमाबद्दल अधिक जाणून घेण्याची चढाओढ सुरू झाली. तिचा विक्रम, जन्मस्थान, कुटुंब, संघर्ष यापेक्षा तिची जात कोणती हे जाणण्यात भारतीयांनी उत्सुकता दाखवली. यामध्ये आंध्रप्रदेश राज्यातील लोकांना तिची जात जाणण्यात अधिक रस दिसला.
याआधी रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकल्यानंतर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची जात सर्वाधिक शोधण्यात आली होती.