श्रीकांतकडून सोन वानला धक्का
By admin | Published: June 23, 2017 12:59 AM2017-06-23T00:59:32+5:302017-06-23T00:59:32+5:30
सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या किदाम्बी श्रीकांतने आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत
सिडनी : सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या किदाम्बी श्रीकांतने आॅस्टे्रलिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कोरियाच्या सोन वान याला पराभूत केले. विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य सामन्यात श्रीकांतने सोनला स्पर्धेबाहेर केले होते. पुन्हा एकदा त्याने या कामगिरीची पुनरावृत्ती करताना दिमाखात आॅस्टे्रलिया ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे, बी. साई प्रणीत, पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या प्रमुख खेळाडूंनीही आपआपल्या सामन्यात बाजी मारताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
श्रीकांतने आपल्या कामगिरीमध्ये कमालीचे सातत्य राखताना ५७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात सोन वानचे तगडे आव्हान १५-२१, २१-१३, २१-१३ असे परतावले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर श्रीकांतने झुंजार पुनरागमन केले. या वेळी, त्याच्या आक्रमकतेपुढे सोन वानचा काहीच निभाव लागला नाही. दमदार स्मॅश आणि नेटजवळील नियंत्रित खेळाच्या जोरावर श्रीकांतने सोन वानला बेजार केले. दुसरीकडे, साई प्रणीतनेही झुंजार विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रणीतने चीनच्या हुआंग युक्सियांगचे आव्हान ६४ मिनिटांमध्ये २१-१५, १८-२१, २१-१३ असे संपुष्टात आणले. महिलांमध्ये भारताच्या दोन्ही प्रमुख खेळाडूंनी विजयी कूच कायम राखल्याने जेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत. स्पर्धेत पाचवे मानांकन लाभलेल्या आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने सरळ दोन गेममध्ये बाजी मारताना चीनच्या चेन झियोझिनचा केवळ ४६ मिनिटांमध्ये २१-१३, २१-१८ असा धुव्वा उडवला. चिनी तैपईची अव्वल मानांकित ताइ त्झू यिंग हिचे कडवे आव्हान सिंधूपुढे उपांत्यपूर्व फेरीत असेल. अन्य सामन्यात गतविजेत्या सायना नेहवालने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना मलेशियाच्या सोनिया चेयाहविरुद्ध २१-१५, २०-२२, २१-१४ असा झुंजार विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत सहावे मानांकन असलेली चिनी खेळाडू सुन यू हिचे तगडे आव्हान सायनापुढे असेल. (वृत्तसंस्था)
महिला दुहेरीमध्ये अश्विन्नी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांना शिहो तनाका-कोहारु योनेमोटो या जपानच्या सहाव्या मानांकित जोडीविरुद्ध २१-१८, १८-२१, १३-२१ असे पराभूत व्हावे लागल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले. तसेच, पुरुष दुहेरीतही सात्त्विक साईराज रंकिरेड्डी-चिराग शेट्टी यांना चिनी तैपईच्या चेन हुंग लिंग - वांग ची लिन यांच्याविरुद्ध १६-२१, १८-२१ने पराभव पत्करावा लागला.
उपांत्यपूर्व फेरीत प्रणीत आणि श्रीकांत एकमेकांविरुद्ध खेळतील. विशेष म्हणजे, सिंगापूर ओपन स्पर्धेचा अंतिम
सामना याच दोन खेळाडूंमध्ये झाला होता. त्या वेळी प्रणीतने बाजी मारत जेतेपद पटकावले होते. या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी या वेळी श्रीकांतकडे असेल.