यूएस ओपनमधून शारापोवाची माघार
By admin | Published: August 31, 2015 11:57 PM2015-08-31T23:57:04+5:302015-08-31T23:57:04+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर दोनची खेळाडू रशियाची मारिया शारापोवा हिने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील नंबर दोनची खेळाडू रशियाची मारिया शारापोवा हिने अमेरिकन ओपन
टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपन सुरू होण्याआधीच चाहत्यांना आज एक मोठा धक्का बसला.
पाच वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन शारापोवाने सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली. ती म्हणाली, ‘‘दुर्दैवाने मी या वर्षाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. मी स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु त्यात यश मिळाले नाही. काही आठवड्यांनंतर मी कोर्टवर पुनरागमन करीन.’’
रशियन सुंदरी शारापोनाने माघार घेतल्यानंतर स्पर्धेच्या आकर्षणालादेखील नक्कीच धक्का बसणार आहे. शारापोवाने या वर्षी जुलै महिन्यात अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सविरुद्ध विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर एकही सामना खेळला नाही. तिने पायाच्या दुखापतीमुळे सिनसिनाटी स्पर्धेतूनही माघार घेतली होती. दुखापतीमुळे वर्षाच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी न होण्याची शारापोवाची तीन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. शारापोवाने २००३मध्ये प्रथम या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. द्वितीय मानांकित शारापोवाच्या जागी रशियाच्या दारिया कसात्किनाला स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे.
शारापोवा यूएएस ओपन स्पर्धेत खेळत नसल्यामुळे सेरेना विल्यम्सचा या वर्षातील अखेरची स्पर्धा जिंकण्याचा मार्ग सुकर होणार आहे. सेरेना विल्यम्ससाठी शारापोवा सर्वांत कठीण प्रतिस्पर्धी होती. (वृत्तसंस्था)