शरथची उपांत्य फेरीत
By Admin | Published: February 19, 2017 01:53 AM2017-02-19T01:53:31+5:302017-02-19T01:53:31+5:30
अचिंत शरथ कमल याने चमकदार खेळ करताना आपला कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या पॉल ड्रिंखालला धक्का देत आयटीटीएफ वर्ल्ड टूर इंडिया ओपन स्पर्धेची विजेतेपद स्पर्धेच्या पुरुष गटाची उपांत्य फेरी गाठली.
नवी दिल्ली : अचिंत शरथ कमल याने चमकदार खेळ करताना आपला कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या पॉल ड्रिंखालला धक्का देत आयटीटीएफ वर्ल्ड टूर इंडिया ओपन स्पर्धेची विजेतेपद स्पर्धेच्या पुरुष गटाची उपांत्य फेरी गाठली.
शरथने जागतिक क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या ड्रिंखालला चुरशीच्या झालेल्या सामन्यात ११-४, १०-१२, ९-११, ११-६, ११-९, ९-११, १३-११ असे नमवले. सामन्यात बरोबरी झाल्यानंतर निर्णयाक सातव्या गेममध्ये शरथने आपले नियंत्रण न गमावता ड्रिंखालला धक्का दिला. शरथ जागतिक क्रमवारीत ड्रिंखालच्या २० स्थानांनी मागे आहे.
याआधी स्पर्धेतील अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या दिमित्रिज ओव्तचारोवला विजयी आगेकूच करण्यासाठी कमालीचे झुंजावे लागले. जागतिक क्रमवारीत ३९व्या स्थानी असलेल्या युव्या ओशिमाकडून दिमित्रिजला ७ गेमपर्यंत झुंजावे लागले. मात्र, आपल्या अनुभवाच्या जोरावर दिमित्रिजने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना ७-११, ११-८, ११-६, ११-८, ४-११, ६-११, १२-१० अशी बाजी मारली. तसेच, १९व्या क्रमांकावरील जपानच्या कोकी निवाने हाँगकाँगच्या जियांग तियानईला ११-९, १०-१२, ११-१, ११-८, ११-८ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)