शार्दूलच्या गोलंदाजीची चमक

By admin | Published: November 1, 2015 03:08 AM2015-11-01T03:08:10+5:302015-11-01T03:08:10+5:30

भारताचा अध्यक्षीय संघ व दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन दिवसीय सराव सामन्यात मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर याने ४ मोहरे टिपून आफ्रिकेला अडचणीत आणले.

Shardul's bowling shine | शार्दूलच्या गोलंदाजीची चमक

शार्दूलच्या गोलंदाजीची चमक

Next

मुंबई : भारताचा अध्यक्षीय संघ व दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दोन दिवसीय सराव सामन्यात मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर याने ४ मोहरे टिपून आफ्रिकेला अडचणीत आणले. मात्र, धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने शतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. तर, डेन विलास व डेल स्टेन यांनी तळाच्या क्रमांकावर केलेल्या आश्वासक फलंदाजीच्या बळावर आफ्रिकेने सामना अनिर्णीत राखला.
मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर हा सामना झाला. नाणेफेक जिंकून भारत अध्यक्षीय संघाने ७८.५ षटकांत २९६ धावांची खेळी केली. त्याला प्रत्युत्तर देताना उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा डाव कोलमडला. शार्दूल ठाकूर याने स्टिअन वान झ्याल (१८) याला उन्मुक्त चंद याच्याकडे झेल देण्यास भाग पाडून पहिला झटका दिला. पाठोपाठ सिमॉन हार्मर (४), फाफ डु प्लेसिस (४) यांना ठाकूरने बाहेरचा रस्ता दाखविला. हशीम आमला (१) याला यादवने त्रिफळा बाद केले, तर नथूसिंग याने डीन एल्गर (२३) याला उन्मुक्त चंदकरवी झेलबाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची १ बाद ३८वरून ५ बाद ५७ धावा, अशी बिकट अवस्था झाली.
त्यानंतर डिव्हिलियर्सने टेम्बा बावुमा याच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पंड्याने बावुमा (१५) याला श्रेयस अय्यर याच्याकरवी झेलबाद करून ही जोडी फोडून आफ्रिकेची ६ बाद १११ अशी स्थिती केली. त्यानंतर डिव्हिलियर्सने डेन विलासला हाताशी घेऊन संघाचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. विलासला (५४) त्रिफळाबाद करून जयंत यादवने ही जोडी फोडली. त्यानंतर डिव्हिलियर्सने १३१ चेंडूंत ११२ धावांची दमदार खेळी करून संघाला अश्वासक स्थितीत आणले. त्याने १८ चौकारांच्या साह्याने आपली खेळी साजरी केली. डिव्हिलियर्सनंतर डेल स्टेनने दहाव्या क्रमांकावर येऊन २८ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या. कुलदीप यादवने व्हेरॉन फिलँडर व स्टेनला पाठोपाठ बाद करून ३०२ धावांवर आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला.

फिरकी सोडून इतर खेळपट्टीवर बळी
घेऊ शकतो
पूर्णत: फिरकीसाठी अनुकूल असणारी खेळपट्टी सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर मला बळी मिळविण्यापासून
कोणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शार्दूल ठाकूर याने दिली. तसेच, हाशीम आमलाचा महत्त्वपूर्ण बळी मिळविण्याबाबत विचारले असता शार्दूल म्हणाला, ‘‘आमलाला झटपट बाद होताना
मी पाहिले आहे; मात्र तो लयीत आल्यावर त्याला बाद करणे अवघड असते. त्यामुळे बाहेरील बाजूने स्विंग होणाऱ्या चेंडूंचा
मारा करण्यावर भर दिला.’’ शार्दूलने हे चारही बळी २५ चेंडूंत
८ धावांच्या मोबदल्यात मिळविले आहेत.

पहिल्या सामन्यासाठी ड्युमिनी बाहेर
डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे अगामी कसोटी सामन्यासाठी जेपी ड्युमिनी संघाच्या बाहेर असेल. त्याच्या उजव्या हाताचे टाके पुढील आठवड्यात काढण्यात येणार असल्याने तो या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. जलदगती गोलंदाज मोर्ने मोर्केल याने
५ षटके गोलंदाजी केली व
एकही धाव दिली नाही. मात्र, सामन्यापूर्वी त्याचीदेखील शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार असल्याचे डोमिंगो याने सांगितले. मात्र, अगामी सामना हा पूर्णपणे खळपट्टी कशी असेल, यावर अवलंबून आहे, असे मतही त्याने व्यक्त केले.

संक्षिप्त धावफलक :
भारत अध्यक्षीय संघ : ७८.५ षटकांत सर्व बाद २९६ (लोकेश राहुल झे. प्लेसिस गो. सिमॉन हार्मर ७२, करुण नायर झे. विलास गो. फिलँडर ४४, नमन ओझा झे. आमला गो. स्टेन ५२, हार्दिक पंड्या झे. विलास गो. हार्मर ४७, स्टेन ३/४६, हार्मर ३/४१, फिलँडर २/३७); दक्षिण आफ्रिका : ६९.२ षटकांत सर्व बाद ३०२ (एबी डिव्हिलियर्स त्रि.गो. यादव ११२, डेन विलास त्रि. गो. यादव ५४, डेल स्टेन ३७ त्रि.गो. कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर ४/७०, जयंत यादव २/३७, कुलदीप यादव २/२४).

Web Title: Shardul's bowling shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.