शार्दुलची विजयी सलामी
By admin | Published: January 29, 2016 03:29 AM2016-01-29T03:29:10+5:302016-01-29T03:29:10+5:30
महाराष्ट्राचा अग्रमानांकीत खेळाडू शार्दुल गागरे याने अपेक्षित कामगिरी करताना ओम खारोलाचा सहज पाडाव करुन पहिल्या मुंबई आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली
मुंबई : महाराष्ट्राचा अग्रमानांकीत खेळाडू शार्दुल गागरे याने अपेक्षित कामगिरी करताना ओम खारोलाचा सहज पाडाव करुन पहिल्या मुंबई आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली. शार्दुलसह इतर अव्वल खेळाडूंनीही अपेक्षित विजय मिळवताना स्पर्धेत दमदार आगेकूच केली.
महाराष्ट्र बुध्दिबळ संघटेने अंतर्गत बीकेसी (वांद्रे) येथील सेंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत शार्दुलने पहिल्याच फेरीत आपल्या आक्रमक खेळाची झलक दाखवून प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी शार्दुलला केवळ ३ गुणांची आवश्यकता असूंन यासाठी त्याला सलग तीन लढती जिंकने जरुरी आहे. या विजयासह पुढील दोन लढती जिंकून शार्दुल ग्रँडमास्टर ठरतो क, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.
काळ्या मोहऱ्यांनी खेळताना शार्दुलने फ्रेंच ओपनींगद्वारे बचावात्मक सुरुवात केली. ओमने किंग पॉन ओपनिंग करुन आपले इरादे स्पष्ट केल्यानंतर शार्दुलने त्याच्या चालींचा अंदाज घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मध्यंतराला शार्दुलने जबरदस्त आक्रमण करताना हत्ती व घोड्याच्या मदतीने वझीरची चाल रचली. या तुफान आक्रमणामुळे भांबावलेल्या ओमकडून चुका होऊ लागल्या. त्याचा पुरेपूर फायदा घेत शार्दुलने ओमच्या राजाला सातत्याने चेक देण्याचा सपाटा लावला. अखेर ४०व्या चालीवर ओमने शार्दुलच्या आक्रमणापुढे शरणागती पत्करली.
इंटरनॅशनल मास्टर शरद टिळकला पहिल्याच सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. सिक्का आन विरुध्द चांगली सुरुवात केल्यानंतर विनाकारण बचावात्मक पवित्रा घेतलेल्या शरदवर दबाव टाकण्यात सिक्काने यश मिळवले.
पहिल्या फेरीचे निकाल
ओम खरोला पराभूत वि. शार्दुल गागरे; स्वप्नील धोपडे वि.वि. सेल्वाभारती टी.; अरविंद बाबू एल. पराभूत वि. स्टॅनी जी. ए.
नितीन एस. वि.वि. अजिंक्य पिंगळे; दुश्यंत शर्मा पराभूत वि. हिमांशू शर्मा; रवी तेजा एस. वि.वि. रुपेश भोगल.
देव शाह पराभूत वि. अक्षत खंपारीया; दिनेश शर्मा वि.वि. सौमील नायर; अभिजीत जोगळेकर पराभूत वि. गुसैन हिमाल; खुशी खंडेलवाल पराभूत वि. विक्रमादित्य कुलकर्णी.