शशांक मनोहर यांचा आयसीसी चेअरमनपदाचा राजीनामा

By admin | Published: March 16, 2017 01:31 AM2017-03-16T01:31:36+5:302017-03-16T01:31:36+5:30

बीसीसीआयवर वैधानिक संकट येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विराजमान झालेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी आश्चर्यकारक निर्णय घेऊन अवघ्या ८ महिन्यांत आयसीसी चेअरमनपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला

Shashank Manohar resigns as ICC president | शशांक मनोहर यांचा आयसीसी चेअरमनपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांचा आयसीसी चेअरमनपदाचा राजीनामा

Next

दुबई : बीसीसीआयवर वैधानिक संकट येताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विराजमान झालेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी आश्चर्यकारक निर्णय घेऊन अवघ्या ८ महिन्यांत आयसीसी चेअरमनपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मे २०१६मध्ये मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, मनोहर यांनी वैयिक्तक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. ५९ वर्षांचे मनोहर यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता.
मनोहर यांनी आपले राजीनामापत्र आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठविले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘गेल्या वर्षी माझी आयसीसीच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाली होती. मी आयसीसीचा पहिला स्वतंत्र चेअरमन बनलो. समितीच्या प्रत्येक निर्णयात आपले सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा आणि नि:पक्षपातीपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, आता वैयिक्तक कारणांमुळे या पदावर राहणे मला शक्य होणार नाही; त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे.’’
‘कर्तव्यकठोर प्रशासक’ अशी ओळख असलेले मनोहर यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद भूषविले होते. २५ सप्टेंबर २००८ ते १९ सप्टेंबर २०११ दरम्यान मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर २०१५मध्ये जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.
आयसीसी चेअरमनपद भूषणविण्याची संधी मिळाल्यावर मनोहर यांनी १० मे २०१६ रोजी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान १२ मे २०१६ रोजी त्यांची आयसीसी चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती.
लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची वेळ येताच मनोहर यांनी बीसीसीआयमधून पळ काढल्याचे आणि बुडते जहाज सोडून सुरक्षित स्थळ शोधल्याची टीका बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी मनोहर यांच्यावर त्या वेळी केली होती.
आयसीसीने शशांक मनोहर
यांचा राजीनामा मिळाल्याच्या
वृत्ताला दुजोरा दिला. मनोहर यांचा ई-मेल मिळाला असून, परिस्थितीचे आकलन केल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे स्पष्ट करण्यात आले.(वृत्तसंस्था)


या कारणामुळे दिला राजीनामा!
आयसीसीत कायदेशीर आणि आर्थिक सुधारणा करण्यास मनोहर यांनी सुरुवात केली होती. त्यांनी त्यासाठी ‘बिग थ्री’(भारत, आॅस्ट्रेलिया व इंग्लंड) यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. या सुधारणा आयसीसीच्या पुढील बैठकीत पारित होणार होत्या. बीसीसीआयने याविरुद्ध मोर्चेबांधणी करून बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा पाठिंबा मिळविला. आर्थिक सुधारणा पारित करण्यासाठी दोनतृतीयांश बहुमत असावे लागते. बीसीसीआयचा संभाव्य विरोध लक्षात घेऊन त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे मत आहे.

Web Title: Shashank Manohar resigns as ICC president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.