शास्त्रीच संचालकपदी
By admin | Published: September 14, 2015 12:36 AM2015-09-14T00:36:12+5:302015-09-14T00:36:12+5:30
पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
नवी दिल्ली : पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्यातरी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा तिढा सुटला आहे.
रविवारी याबाबतीत अधिकृतरीत्या जाहीर करताना बीसीसीआयने शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवताना संजय बांगर, भरत अरुण आणि श्रीधर या सहाय्यक प्रशिक्षकांच्या कार्यकाळामध्येही टी-२० विश्वचषकपर्यंत वाढ केली आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या वतीने हा निर्णय घण्यात आला. याबाबत बीसीसीआयने सांगितले की, सध्या टीम इंडियाची कामगिरी शानदार होत आहे. तसेच कोचिंग स्टाफने देखील उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने आम्ही
हा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला.
याचीही शक्यता...
सध्या बीसीसीआय आपल्या इतर कामांमध्ये व्यस्त आहे. यामुळे शास्त्री आणि सहय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याचे चर्चा होत आहे. नुकताच काही दिवसांपुर्वी सचिन ठाकूर यांनी आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेपुर्वी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र या निर्णयामुळे प्रशिक्षकपदाच्या महत्त्वाच्या निवड प्रक्रियेसाठी बीसीसीआय अतिरीक्त वेळ घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. (वृत्तसंस्था)