कोचपदाच्या शर्यतीत शास्त्री आघाडीवर

By admin | Published: July 10, 2017 01:17 AM2017-07-10T01:17:58+5:302017-07-10T01:17:58+5:30

तीन सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सोमवारी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी दावेदारांबाबत चर्चा करेल

Shastri leads the CoachPad race | कोचपदाच्या शर्यतीत शास्त्री आघाडीवर

कोचपदाच्या शर्यतीत शास्त्री आघाडीवर

Next

मुंबई : तीन सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सोमवारी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी दावेदारांबाबत चर्चा करेल. त्या वेळी माजी संघसंचालक रवी शास्त्री या पदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असतील.
या पदासाठी १० व्यक्तींनी बीसीसीआयकडे अर्ज सादर केले आहेत. त्यात शास्त्री यांच्याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा (ओमान राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक), फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रह्मचारी (इंजिनियर, क्रिकेटची कुठलीही पार्श्वभूमी नाही) यांचा समावेश आहे. सीएसी या १०पैकी ६ उमेदवारांची मुलाखत घेणार असल्याचे वृत्त आहे.
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीसाठी संभाव्य उमेदवारांमध्ये शास्त्री, सेहवाग, मुडी, सिमन्स, पायबस व राजपूत यांचा समावेश असू शकतो. सध्या क्लूसनर यांना स्टॅन्डबाय ठेवले जाऊ शकते, पण त्यांची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता धुसर आहे. विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुंबळे-कोहली वादानंतर सीएसीला आपल्या पसंतीबाबत सावधगिरी बाळगावी लागेल; कारण नव्या प्रशिक्षकाला दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे.
शास्त्रीने सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता. पण बीसीसीआयने अर्ज स्वीकारण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढविली त्या वेळी माजी कर्णधार शास्त्रीने अर्ज केला. आता शास्त्री या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कोहलीसोबतच्या चांगल्या संबंधांमुळे शास्त्री या पदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने ५० षटकांच्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. शास्त्री यांच्याबाबत सौरव गांगुली यांचे मत काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शास्त्री व सौरव यांनी यापूर्वी एकमेकांवर टीका केली होती. (वृत्तसंस्था)
शास्त्री यांनी आरोप केला होता, की स्काइपीच्या माध्यमातून मुलाखत झाली त्या वेळी गांगुली उपस्थित नव्हते. गांगुली यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, की जर शास्त्री पदाबाबत गांभीर्याने विचार करीत होते तर त्यांनी मुलाखतीसाठी वैयक्तिक उपस्थित राहायला हवे होते.
आक्रमक सलामीवीर फलंदाज सेहवागही या पदासाठी एक मजबूत दावेदार आहे. मात्र त्याला प्रशिक्षक म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. सेहवाग दोन वर्षांपासून किंग्स इलेव्हन पंजाबचा मेंटर आहे; पण संघाला अनुकूल निकाल मिळविता आले नाहीत.
मुडी यांची दावेदारी नाकारता येणार नाही; कारण आंतरराष्ट्रीय व फ्रॅन्चायझी प्रशिक्षकपदाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या
मार्गदर्शनाखाली श्रीलंका संघाने २०११मध्ये विश्वकप स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. आयपीएलमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सनरायजर्स हैदराबाद संघाने जेतेपद पटकावले आहे.
मुडी गेल्या वर्षीही मुलाखतीसाठी उपस्थित होते, पण कुंबळेच्या तुलनेत ते पिछाडीवर पडले. त्यामुळे या वेळी त्यांच्याकडे डोळेझाक करता येणार नाही.
मुडी यांची या पदावर वर्णी लागली तर आॅस्ट्रेलियाचे त्यांचे सहकारी क्रेग मॅकड््रमॉट यांना गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी पसंती मिळू शकते. जर शास्त्री यांची निवड झाली तर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण यांची दावेदारी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
क्लूसनरनेही अर्ज दाखल केला आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक लीगमध्ये विभागीय संघांना प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभव आहे. सिमन्स अफगाणिस्तान व आयर्लंड यांच्यासारख्या संघांसाठी चांगले प्रशिक्षक ठरले आहेत. विंडीजसोबतचा त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता, कारण संघनिवडीबाबत त्यांचा आक्षेप होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Shastri leads the CoachPad race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.