‘ती’ आॅफर हिकेनने दिलेली...

By admin | Published: July 14, 2015 03:02 AM2015-07-14T03:02:04+5:302015-07-14T03:02:04+5:30

आयपीएलच्या आठव्या सत्रात राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज प्रवीण तांबेला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईचा रणजीपटू

'She' gave it to Hicken ... | ‘ती’ आॅफर हिकेनने दिलेली...

‘ती’ आॅफर हिकेनने दिलेली...

Next

नवी दिल्ली : आयपीएलच्या आठव्या सत्रात राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज प्रवीण तांबेला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईचा रणजीपटू हिकेन शाहा याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निलंबित केले आहे. मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी अचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हिकेश शाह याच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे बीसीसीआयने एका पत्रकाद्वारे सांगितले. तसेच हे प्रकरण पुढील कारवाईसाठी शिस्तपालन समितीकडे सोपविण्यात आले आहे.
आयपीएलचे सहावे पर्व स्पॉट फिक्सिंगमुळे चांगलेच गाजले. या वेळी खेळापेक्षा फिक्सिंगचीच चर्चा अधिक झाली. यामुळे मलीन झालेल्या खेळाच्या प्रतिमेला पुन्हा उंचावण्याचे आव्हान बीसीसीआयपुढे होते. त्यानुसार बीसीसीआयने अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलताना विशेष समितीचीदेखील स्थापना केली. याचा सकारात्मक परिणाम पुढील दोन सत्रांत पाहायला मिळाला. परंतु, यंदाच्या एप्रिल-मे महिन्यात झालेल्या आयपीएलच्या ८व्या पर्वातील सुरुवातीला राजस्थान रॉयल्सच्या प्रवीण तांबेने आपल्याला फिक्सिंगच्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पुन्हा एकदा आयपीएल वादग्रस्त झाले.
या वेळी फिक्सिंगसाठी आॅफर देणाऱ्या व्यक्तीबाबत गुप्तता पाळताना केवळ ती व्यक्ती मुंबई रणजीपटू असल्याचे सांगण्यात आले होते. सोमवारी बीसीसीआयने एका पत्रकाद्वारे हिकेश शाहची माहिती देऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे स्पष्ट केले. दखल घेण्याची बाब म्हणजे, २०१३ साली स्थापन करण्यात आलेल्या लोढा समितीद्वारा मंगळवारी अहवाल सादर करण्यात येणार असून, एक दिवसआधीच हिकेनचे नाव समोर आल्याने आयपीएल फिक्सिंग चर्चेचा विषय झाला आहे.
बीसीसीआयने याबाबत सांगितले, की मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी भ्रष्टाचारविरोधी समितीला (एसीयू) त्वरित तपासणीचे आदेश दिले होते. यानंतर झालेल्या तपासणीमध्ये हिकेन शाह आरोपी आढळल्याने त्याच्यावर बीसीसीआय अचारसंहिता २.१.१; २.१.२ आणि २.१.४ कलम अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे.
(वृत्तसंस्था)

३० वर्षीय हिकेन शाहने मुंबईकडून खेळताना चमकदार खेळ केला असल्याने मुंबई क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. हिकेनने ३७ प्रथम श्रेणी सामन्यांत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना ४२.३५ च्या सरासरीने २ हजार ६१० धावा फटाकवल्या आहेत. दखल घेण्याची बाब म्हणजे, बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीकडून निर्णय येईपर्यंत हिकेन बीसीसीआय मान्यताप्राप्त कोणत्याही स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने, त्याची कारकीर्द आता जवळपास संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.


अशी मिळाली माहिती
हिकेन आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचा सदस्य नाही. परंतु त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपलाच संघसहकारी प्रवीण तांबेला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीणने या आॅफरला बळी न पडता त्वरित संघाच्या व्यवस्थापनाकडे याबाबतची माहिती दिली व संघ व्यवस्थापनाकडे याची दखल घेऊन लगेच बीसीसीआयला कळवले होते.

क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार बीसीसीआय कदापी सहन करणार नाही. अशा प्रकरणांविरोधात आम्ही कठोर कारवाई करू जेणेकरून इतर खेळाडूंवर त्याची वचक बसेल. आम्ही हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे दिले असून, त्यानुसार दोषी खेळाडूवर पुढची कारवाई करण्यात येईल.
- जगमोहन दालमिया,
अध्यक्ष, बीसीसीआय

बीसीसीआय भ्रष्टाचार रोखण्यासाठी अत्यंत जागरुक असल्याचेच या प्रकरणातून सिद्ध होत आहेत. ज्या खेळाडूला अडकवण्याचा प्रयत्न झाला तो अत्यंत सतर्क असल्याने त्याने लगेच याबाबत एसीयूला कळवले. भ्रष्टाचारविरोधी आमची लढाई अशीच सुरू राहील व त्यामध्ये आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही.
- अनुराग ठाकूर, सचिव, बीसीसीआय

Web Title: 'She' gave it to Hicken ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.