शिखर धवन व यादव सर्वोत्तम!
By Admin | Published: March 28, 2015 01:56 AM2015-03-28T01:56:39+5:302015-03-28T01:56:39+5:30
विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ जेतेपद राखण्यात अपयशी ठरला.
नवी दिल्ली : विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध ९५ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ जेतेपद राखण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारतीय संघातर्फे फलंदाजीमध्ये सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादव यांची कामगिरी सर्वोत्तम ठरली.
शिखरने ८ सामन्यांत ५१.५० च्या सरासरीने भारतातर्फे सर्वाधिक ४१२ धावा फटकावल्या. त्यात दोन शतकी आणि एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. उमेश यादवने उपांत्य फेरीत चार बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीला पिछाडीवर सोडले. यादवने ८ सामन्यांत १७.८३ च्या सरासरीने १८ बळी घेतले.
क्षेत्ररक्षणामध्ये उमेश यादवने सर्वाधिक ८ झेल टिपले. शिखरने ७, रैनाने ६, शमी, विराट व अजिंक्य रहाणे यांनी प्रत्येकी पाच झेल टिपले.
यष्टिरक्षणामध्ये धोनीने यष्टीपाठी १५ बळी घेतले. अंतिम लढतीपूर्वी तो सर्वांत आघाडीवर आहे. अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन व न्यूझीलंडचा यष्टिरक्षक ल्युक रोंची यांना अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. हॅडिनने १४ व रोंचीने १३ बळी घेतले आहेत. भारताने या विश्वकप या स्पर्धेत सर्वाधिक स्कोअर (७ बाद ३०७ धावा) साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवला. भारताने बांगलादेश व पाकिस्तानविरुद्धही ३०० धावांचा आकडा गाठला होता. विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम शिखर व रोहित यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. शिखरने मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३७ व रोहितने याच मैदानावर बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत १३७ धावांची खेळी केली होती. शिखरने या स्पर्धेत हॅमिल्टनमध्ये आयर्लंडविरुद्ध १०० धावा केल्या होत्या. भारतातर्फे या स्पर्धेत शतक ठोकणाऱ्या अन्य फलंदाजांमध्ये सुरेश रैना (नाबाद ११०) आणि विराट कोहली (१०७) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
फलंदाजी...
शिखरनंतर रोहित शर्मा (३३०) दुसऱ्या स्थानी आहे; तर विराट कोहली (३०५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सुरेश रैना (२८४), कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२३७) आणि रहाणे (२०८) यांचा क्रमांक लागतो.
गोलंदाजी...
उमेश यादवनंतर (१८) मोहम्मद शमी (१७), मोहित शर्मा (१३), रवीचंद्रन आश्विन (१३) आणि रवींद्र जडेजा (९) यांचा क्रमांक लागतो.