शिवछत्रपती पुरस्कार घोषणेला अखेर मुहूर्त; तीन वर्षांपासून रखडलेल्या पुरस्कारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:55 AM2018-02-13T03:55:42+5:302018-02-13T03:55:52+5:30
राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा सोमवारी मुंबईत केली. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा करतानाच तिन्ही वर्षातील पुरस्कारपात्र खेळाडूंना १७ फेब्रुवारीला गेट वे आॅफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येईल, असेही सांगितले.
पुणे : राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा सोमवारी मुंबईत केली. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा करतानाच तिन्ही वर्षातील पुरस्कारपात्र खेळाडूंना १७ फेब्रुवारीला गेट वे आॅफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येईल, असेही सांगितले.
क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाºया खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मात्र, गेले दोन वर्षांपासून हे पुरस्कार रखडले होते आणि यंदाच्या वर्षाच्या पुरस्कारांसह रखडलेल्या पुरस्कारांचीही घोषणा सोमवारी करण्यात आली. त्याचवेळी गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात क्रीडामंत्री तावडे यांनी घोषणा केलेल्या क्रीडा पत्रकारांच्या पुरस्काराची मात्र कोणतीही घोषणा झाली नाही. घोषणा करण्यात आलेल्या पुरस्कारानुसार रमेश
तावडे (अॅथलेटिक्स, २०१४-१५), अरुण दातार (२०१५ - १६ मल्लखांब) या पुणेकरांसह कोल्हापूरच्या बिभीषण पाटील (२०१६ - १७, पॉवर बॉडीबिल्डिंग) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे, २०१४-१५ या
वर्षासाठी एकूण २२३ अर्जांमधून ७२ पुरस्कार, २०१५-१६ वर्षांसाठी २४१ अर्जांमधून ५९ पुरस्कार आणि
२०१६-१७ वर्षासाठी ३१२ अर्जांमधून ६४ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तिन्ही वर्षांचे मिळून यावेळी एकूण १९५ पुरस्कार विजेत्या खेळाडूंची घोषणा क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आली. पुण्यातील सर्वाधिक एकूण ५१ पुरस्कार मार्गदर्शक, खेळाडू, संघटक यांनी संपादन केले आहेत.
पुण्यातील पुरस्कार विजेते : २०१४ -१५ : सविता मराठे, भास्कर भोसले, प्रवीण देशपांडे, रणजित चांबले, सुनील लिमण, मिलिंद झोडगे, अनंत शेळके, चंद्रकांत मानवडकर, स्वाती गाढवे, अक्षयराज कोरे, प्रिताली शिंदे, संतोष घाडगे, शिवानी शेट्टी, तेजश्री नाईक, शिरीन लिमये, पूजा ढमाळ, किशोरी शिंदे, ऐश्वर्या रावडे, गुरुबन्स कौर.
२०१५ -१६ : मिलिंद पठारे, श्रीपाद शिंदे, प्रवीण बोरसे, ऋचा पाटील, अभिषेक केळकर, ऋतुजा सातपुते, श्रद्धा तळेकर, सलमान शेख, स्नेहल वाघुले, पूजा शेलार, कोमल पठारे, तेजस कोडे, रुपेश मोरे.
२०१६ -१७ : सोपान कटके, लाला भिलारे, स्वप्निल ढमढेरे, मेघा सुनील अगरवाल, आकांक्षा हगवणे, शशिकांत कुतवळ, अभिमन्यू पुराणिक, कृष्णा काळे, तेजस शिंदे, हर्षद वाडेकर, ओमकार पवार, रोहन मोरे, जयंत गोखले, जोसेफ डिसुजा, अबोली जगताप.
- पुण्यातील आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्धपटू सलमान शेख, बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिक, आकांक्षा हगवणे, अॅथलेटिक्स खेळाडू स्वाती गाढवे, चंद्रकांत मानवडकर, ऋचा पाटील, सायकलपटू ऋतुजा सातपुते, ट्रायथलॉन खेळाडू तेजश्री नाईक, आंतरराष्ट्रीय बॉस्केटबॉल खेळाडू शिरीन लिमये, स्नेहल वाघुले, पूजा ढमाळ यांच्यासह खाडी व समुद्र प्रकारात नुकत्याच विक्रम केलेल्या रोहन मोरे यांना खेळाडू छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ललिता बाबर व स्वाती गाढवे यांचे मार्गदर्शक भास्कर भोसले, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपिका जोसेफ हिचे प्रशिक्षक अनंत शेळके, हँडबॉलचे रूपेश मोरे, तिरंदाजीचे रणजित चांबले, तायक्वांदोचे मिलिंद पठारे व प्रवीण बोरसे बुद्धिबळचे जयंत गोखले व जोसेफ डिसुजा यांना छत्रपती मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा जीवनगौरव दिला त्याबद्दल मी आभार मानतो. मी ४१ वर्ष व्यायामशाळा चालवतोय इतक्या वर्षाच्या कायार्ची सरकारने दखल घेतली हे फारच छान वाटते. हि माज्या पाठीवरची एक थाप आहे की मी आता थांबणार नाही पुढे जात राहणार आहे. या पुरस्कारामागे माझी पत्नी, कुटुंब तसेच माझे विद्यार्थी सुद्धा आहेत. माज्या विद्यार्थ्यांनी व्यायाम प्रकारातील शेकडो बक्षीस मिळवली. सरकारने मोठा आहेर दिला आहे आणि शिवछत्रपतींच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचे मला कौतुक वाटते.
- डॉ. अरुण दातार
जीवनगौरव पुरस्काराचा फारच आनंद होत आहे. मॅरेथॉन म्हणजे पळणे हा संदेश समाजापर्यंत गरजेचे आहे आणि तो आम्ही पोहोचवत आहोत. मॅरेथॉन सारख्या खेळात खूप पळावे लागते आणि त्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. पण हाखेळ खेळणारा तरुण नोकरी आणि खेळाला काही अनुदान नसल्याने मॅरेथॉन मध्ये भाग घेत नाही. शिवाय पळणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर असूनसुद्धा आपला भारतीय खेळाडू हि पातळी पार करू शकत नाही याची खंत वाटते. आपल्या शहरात प्रत्येक प्रभागात एक मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा असायला पाहिजे. शिवाय मुलांना लाहनापणापासून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे.
- रमेश तावडे