शिव थापा, अमित पंघाल यांची उपांत्य फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:57 AM2019-05-23T04:57:18+5:302019-05-23T04:57:24+5:30
इंडिया ओपन मुष्टीयुद्ध : अन्य पाच खेळाडूंचीही आगेकूच
गुवाहाटी : विश्व चॅम्पियनशीपच्या कांस्य पदकाचा विजेता शिव थापा आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्ण विजेता अमित पंघाल यांनी बुधवारी येथे दुसऱ्या इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरीत जागा मिळवली. कर्मवीर नवीन चंद्र बोरदोलाई इनडोअर स्टेडियममध्ये पाच अन्य भारतीय देखील उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरले.
या स्टेडियममध्ये तीन वर्षे आधी राष्ट्रीय विजेता ठरलेल्या शिव याने ६० किलो गटात मॉरिशसच्या हेलेन डेमियन याला ५ -० ने पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा मिळवली. त्याचा पुढील सामना पोलंडच्या डी. ख्रिस्तीयन स्केपांस्कीसोबत होईल.
आॅलिम्पिक पात्रतेचे लक्ष्य ठेवत स्पर्धेतील ६३ किलो गटात सहभागी होणाºया शिव याने सांगितले, ‘मी आपल्या गटात पहिल्यांदाच एवढ्या उंचीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा सामना केला. तो मोठ्या अंतराचे पंच मारु शकतो. त्यामुळे माझी रणनिती ही होती की, हीट केल्यानंतर वेगाने त्याच्यापासून लांब जाणे, हे खुप फायदेशीर ठरले.’ शिव याची लढत पाहण्यासाठी त्याचे वडील पदम थापासह परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे, अंकित आणि मनीष कौशिक यांनी देखील आपापल्या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात ५ -० या विजयासह ६० किलो मध्ये पुढच्या फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे ५२ किलो गटात उपांत्य फेरीत चार भारतीय मुष्टीयोद्धांनीही जागा मिळवली. पंघाल प्रमाणेच राष्ट्रीय चॅम्पियन पी.एस. प्रसाद, पूर्व विश्व विजेता सचिन सिवाच आणि राष्ट्रकूल स्पर्धेतील गतविजेता गौरव सोलंकी अंतिम चारमध्ये पोहचले. पंघाल याने थायलंड याने चकाचोंग चानपिरोमविरुद्ध ५ -० असा सहज विजय मिळवला. पंघाल म्हणाला की, ‘त्याला पारखण्याची आणि त्याच्या खेळाची शैली समजण्यासाठी मला काही वेळ लागला. मला आनंद आहे की, याचा फायदा झाला.’ पंघाल उपांत्य फेरीत राष्ट्रीय विजेता प्रसादसोबत भिडेल. अन्य उपांत्य फेरीत सचिन सिवाचचा सामना सोलंकीविरुद्ध होईल. सिवाचने विश्व चॅम्पियनशीपच्या कांस्य विजेत्या फिलीपिन्सच्या रोगन लेडन याला ४ -१ असे पराभूत केले. दुसरीकडे सोलंकीने मॉरीशसच्या लुई फ्लुरोटवर ५ -० असा एकतर्फी विजय मिळवला. (वृत्तसंस्था)